Raksha Bandhan 2020 Date: यंदा रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होणार? काय आहे राखीपौर्णिमेचे महत्त्व? घ्या जाणून
Raksha Bandhan 2020 (Photo Credits: File Image)

Raksha Bandhan 2020 Date & Significance: श्रावण महिन्याची चाहुल लागताच अनेक सणांना, व्रत-वैकल्यांना आरंभ होतो. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा बहिण-भावाचं नातं सेलिब्रेट करणारा सण साजरा केला जातो.  यंदा हा सण  सोमवार,  3 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. भाऊ-बहिणीचं नातं अधिक घट्ट करणार हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिण  औक्षण करुन भावाला राखी बांधते आणि भाऊ जन्मभर तिची रक्षा करणार असे वचन तिला देतो. तसंच भावानं ओवाळणी देण्याचीही पद्धत आहे. त्यामुळे कॅश, साडी, चॉकलेट्स किंवा छानसं गिफ्ट या रुपात बहिणीला ओवाळणी मिळत असते. श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा देखील साजरी केली जाते. कोळी बांधवांसाठी हा सण मोठा उत्साहाचा असतो.

यंदा रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होणार?

यंदा सोमवार. 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. राखी बांधण्यासाठी शुभवेळ सकाळी 9.25 मिनिटांनंतर सुरु होणार आहे. त्यामुळे त्यानंतर दिवसभरात तुम्ही राखीपौर्णिमा साजरी करु शकता.

राखीपौर्णिमा किंवा रक्षाबंधन याचं नेमकं महत्त्व काय?

पुराणात राखीपौर्णिमेच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. एकदा देव आणि दानवांचे युद्ध सुरु असताना देवांचा पराभव होऊ लागला. त्यावेळेस देवांचे गुरु बृहस्पती यांनी श्रावणी पौर्णिमेला इंद्राच्या हातात अपराजिता नावाचे कवच बांधले त्यामुळे तो ती लढाई जिंकला. राक्षसांचा राजा बली याला दैत्यगुरु शुक्राचार्यांनी राखी बांधली व त्यामुळे देवांशी झालेल्या एका लढाईत तो जिंकला अशी कथा सांगितली जाते. आणखीन एक अशी कथा आहे की, विष्णुने वामनावतार घेऊन बलिराजाला पाताळात ढकलले या पापामुळे विष्णुला बलिराजाच्या वाड्यावर द्वारपाल म्हणून राहावे लागले. त्यावेळेस नारदमुनींनी सुचवलेल्या युक्तीनुसार लक्ष्मी देवीने बलिराजाला राखी बांधली आणि बहिणीला परतभेट द्यायला हवी म्हणून बलिराजाने विष्णुला द्वारपाल होण्यापासून मुक्त केले. इंद्र जेव्हा वृत्रासुराशी लढायला गेला तेव्हा इंद्राणीने त्याच्या हातात राखी बांधली होती. त्यामुळे पूर्वी राजा लढाईला निघाला की पुरोहित त्याच्या हातात राखी बांधत असतं.

असा हा श्रावण पौर्णिमेचा पवित्र दिवस. बहिण-भावाच्या प्रेमाचा हा सण जीवनात आनंद आणतो हे नक्की.