Ganeshotsav 2019: नरमुख गणेश मंदिर; मानवी चेहरा असलेला जगातील एकमेव गणपती, जाणून घ्या आख्यायिका
नर-मुख विनायक (संग्रहित संपादित प्रतिमा)

2 सप्टेंबर पासून मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2019) सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गणरायाचे आगमन झाले आहे, तसेच अनेक सार्वजनिक मंडळेही हा उत्सव साजरा करीत आहेत. या काळात गणपतीची विविध रूपे पाहायला मिळतात, वेगवेगळ्या आकाराच्या गणपतींचे दर्शन घडते. मात्र सोंड असलेला गणपतीच सर्वत्र दिसतो. पण तुम्हाला माहित आहे जगात असे एक मंदिर आहे जिथे गणपती चक्क मानवी रुपात (Human Head) आहे. होय. तामिळनाडूमधील (Tamil Nadu) कुथनुर गावापासून दोन किमी अंतरावर तीलतर्पणपुरी येथे मानवी रूपातील गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायक मंदिर म्हणून ओळखले जाते.

या मंदिराला आदि विनायक मंदिर (Adhi Vinayaka) असेही म्हणतात. या गणेश मूर्तीला मानवी चेहरा असल्याने त्याला 'नर-मुख विनायक(Nara Mukha Vinayaka) या नावाने सुद्धा ओळखले जाते. मानवी चेहरा असलेली ही मूर्ती आणि हे मंदिर जगात एकमेव आहे. दक्षिणेकडे आदि विनायकाची मूर्ती ही त्याचा भाऊ अय्यापन अथवा मुरुगन यांच्याशी मिळतीजुळती बनवली जाते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे पितरांना शांती मिळावी म्हणून पूजा केली. या गोष्टीचा संदर्भ थेट रामायणाशी आहे. (हेही वाचा: Ganeshotsav 2019: अष्टविनायकामधील पहिला गणपती 'मोरगावचा मोरेश्वर'; जाणून घ्या मंदिर, मूर्ती आणि पौराणिक महत्व)

पितरांना शांती मिळावी म्हणून येथे रामाने पूजा केली होती. त्यामुळे हे स्थान पितरांना शांती मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तीलतर्पण या नावामागे हाच अर्थ आहे. तीलतर्पण म्हणजे पूर्वजांना समर्पित. शंकराने गणपतीचे शीर छाटले त्यानंतर त्या जागी गणपतीला हत्तीचे मुख बसवण्यात आले ही आख्यायिका आपण सर्वजण जाणतोच. मात्र आदि विनायक गणपती हा या घटनेच्या पूर्वीचा गणपती होय त्यामुळे तो मानवी चेहऱ्यासह दिसतो.