World Suicide Prevention Day: अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवी जीवन मौल्यवान मानले गेले आहे. माणूस सर्व अपेक्षा घेऊन जन्माला येतो. मात्र, आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर निराशेची लाट मनावर अशी विध्वंस करते की, तो आपले अनमोल आयुष्य स्वतःच्या हातून संपवतो. सध्या जगभरात आत्महत्येचा ट्रेंड वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन' (World Suicide Prevention Day) आयोजित केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखणे हा आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार जगात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते.
2021 मध्ये देशात 1 लाख 64 हजार 33 जणांनी केल्या आत्महत्या -
भारतातील आत्महत्यांची संख्याही चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वी, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने 2021 मध्ये भारतातील आत्महत्या प्रकरणांबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार 2021 मध्ये देशात 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. अहवालानुसार 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये आत्महत्या 7.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत. NCRB नुसार, व्यावसायिक किंवा करिअरशी संबंधित समस्या, एकटेपणाची भावना, अत्याचार, हिंसाचार, कौटुंबिक समस्या, मानसिक विकार, दारूचे व्यसन, आर्थिक नुकसान आणि काही जुनाट आजार ही आत्महत्यांच्या घटनांमागील प्रमुख कारणे आहेत. (हेही वाचा - Hindi Diwas 2022: 'हिंदी दिवस' कधी आहे? हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास आणि महत्त्व काय? जाणून घ्या)
स्पर्धेच्या या युगात तणाव शिगेला पोहोचला आहे. यातून निर्माण होणारे नकारात्मक विचार कधी कधी इतके प्रबळ होतात की लोक जीवन संपवण्याचा धोकादायक मार्ग निवडतात. म्हणून, जेव्हा जेव्हा अशी अस्वस्थ परिस्थिती जाणवते तेव्हा एखाद्याने आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसह वेळ घालवला पाहिजे, जे गंभीर परिस्थितीत मानसिक आधार देऊ शकतात. जर कधी जास्त ताण किंवा मानसिक आजार जाणवत असेल तर लगेच मानसोपचार तज्ज्ञांना भेटा आणि तुमची समस्या सांगा.
दरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये केंद्र सरकारने मानसिक आरोग्य पुनर्वसन हेल्पलाइन (किरण हेल्पलाइन) क्रमांक देखील जारी केला होता. लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरुकता पसरवून आत्महत्येच्या घटनाही बऱ्याच अंशी कमी करता येतात.