National Space Day 2024: चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसह भारताने संपूर्ण जगात आपली क्षमता सिद्ध केली. अशा परिस्थितीत, भारत सरकारने दरवर्षी मिशन चांद्रयानच्या यशाचा उत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे. ज्या दिवशी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला तो दिवस, म्हणजेच 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन (National Space Day 2024) म्हणून साजरा केला जाणार आहे. याआधी इस्रोने 13 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. इस्रोने पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या या दिवसाची जोरदार तयारी सुरु केली आहे.
इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी देशभरातील लोकांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. इस्रो प्रमुख म्हणाले की, या दिवशी इस्रोतर्फे देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, इस्रो 23 ऑगस्ट रोजी भारतीय अंतरीक्ष हॅकाथॉनचे (Hackathon) आयोजन करणार आहे.
हॅकाथॉन-
हॅकाथॉन हा असा एक कार्यक्रम आहे, जिथे लोक समस्या सोडवण्यासाठी किंवा नवीन संधी ओळखण्यासाठी एकत्र येतात. इस्रो प्रमुखांनी नमूद केले की, हॅकाथॉनची रचना नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि स्पेस-आधारित ऍप्लिकेशन्समध्ये ऍप्लिकेशन-चालित इकोसिस्टम तयार करण्यासाठी केली गेली आहे, ज्याद्वारे समाज आणि देश दोघांनाही फायदा होईल.
एस सोमनाथ यांनी सांगितले की भू-स्थानिक डोमेन, अंतराळ विज्ञान, प्रतिमा प्रक्रिया आणि एआय/एमएल क्षेत्रातील 12 समस्या हॅकाथॉनसाठी निवडल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी देशभरातील पदवीपूर्व/पदव्युत्तर/पीएचडी विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तीन ते चार विद्यार्थ्यांची टीमही यात सहभागी होऊ शकेल. सुरुवातीला, 100 संघ त्यांची विचार प्रक्रिया आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनावर आधारित निवडले जातील. त्यानंतर, 13 आणि 14 ऑगस्ट रोजी एनआरएससी, हैदराबाद येथे आयोजित ग्रँड फिनालेसाठी तज्ञ समिती 30 संघांची निवड करेल.
2023 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान ही मोहीम चंद्रावर यशस्वीपणे पाठवली होती. चांद्रयान-3 मोहिमेने भारताला केवळ विज्ञानाच्याच क्षेत्रात एका नव्या उंचीवर नेले नाही, तर अवकाश संशोधनातही महत्त्वाचे योगदान दिले. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि तेथून वैज्ञानिक डेटा गोळा करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. (हेही वाचा: NASA Transmits Hip-Hop Song To Venus: नासाने रचला इतिहास! अवकाशात गुंजले हिप-हॉपचे बोल; प्रकाशाच्या वेगाने शुक्रावर प्रसारित केले Missy Elliott चे गाणे)
दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वदेशी अवकाश अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बजेटमध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्या म्हणाल्या, भारतीय अंतराळ अर्थव्यवस्था पुढील दशकात पाच पटीने वाढेल. हा व्हेंचर कॅपिटल फंड आहे, ज्याद्वारे अंतराळ उद्योगात गुंतवणूक केली जाणार आहे. ही गुंतवणूक कशी आणि कोणत्या पद्धतीने केली जाईल, हे अर्थमंत्र्यांनी सांगितले नाही. मात्र या बातमीने खासगी अवकाश उद्योगात आनंदाची लाट पसरली आहे. स्पेस-टेक स्टार्टअप अग्निकुलचे सह-संस्थापक श्रीनाथ रविचंद्रन म्हणाले की ही एक चांगली बातमी आहे. त्यामुळे खासगी अवकाश कंपन्यांना पुढे जाण्यास मदत होणार आहे. तसेच नवीन खेळाडू मैदानात येतील.