Mount Mary Fair 2019 (संग्रहोत संपादित प्रतिमा)

भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येक धर्माचे लोक एकाच भूमीवर, एकाच वेळी आपले सण-उत्सव आनंदाने साजरे करतात हेच भारताचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. 2 सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली. काल मोठ्या उत्साहात ख्रिश्चन बांधवांनी मदर मेरीचा जन्मदिवस साजरा केला. त्यानंतर पुढचे आठ दिवस बांद्रा (Bandra) येथील माउंट मेरी चर्च (Mount Mary Church) मध्ये माउंट मेरी (Mother Mary) उत्सव साजरा केला जाईल. संपूर्ण जगात 8 सप्टेंबर हा येशू ख्रिस्ताची आई मदर मेरीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

माउंट मेरी चर्च हे मुंबई शहरातील एक प्रसिद्ध चर्च आहे. हे माउंट ऑफ अवर लेडी ऑफ बॅसिलिका (Basilica Of Our Lady of The Mount) म्हणून देखील ओळखले जाते. हे चर्च 1640 मध्ये बांधले गेली आणि 1761 मध्ये त्याची पुनर्रचना केली. सध्याची चर्चची इमारत फक्त 100 वर्ष जुनी आहे, मात्र पोर्तुगालमधील जेसूट प्रिस्टने 16 व्या शतकात मदर मेरीची सध्याची मूर्ती इथे आणली व इथे एक चर्च बांधले. इथे मदर मेरीची जयंती फार मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. या आठ दिवसांच्या काळात इतर धर्माचे लोकही या चर्चला भेट देतात. या चर्चचा परिसर अतिशय भव्य असून रमणीय आहे. या उत्सवाच्या काळात या परिसरात शेकडो व्यापारी आपले स्टॉल्स लावतात. प्रत्येक स्टॉल्सवर मिळणाऱ्या विविध आकाराच्या, रंगाच्या मेणबत्त्या हे इथले महत्वाचे आकर्षण असते.

(हेही वाचा: गणपती आणि माउंट मेरी उत्सवामुळे BEST कडून ज्यादा बसेसची सोय; जाणून घ्या मार्ग आणि वेळापत्रक)

पुढचे 7 दिवस म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. या काळात चर्चला भेट देणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने ज्यादा बसेसची सोय केली आहे. 8 ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये बांद्रा स्टेशन ते हिल रोड या दरम्यान या ज्यादा बसेस धावणार आहेत. दरम्यान, ख्रिश्चन धर्मीयांमध्ये तसेही फार कमी सण साजरे केले जातात. मात्र जितके आहेत त्या सणांमध्ये ख्रिसमस आणि मदर मेरी जन्मदिवस फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.