Importance and Significance Of Mohini Ekadashi 2019: वैशाख महिन्यातील शुल्क पक्षात येणाऱ्या एकादशीला 'मोहिनी एकादशी' असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णू यांनी मोहिनी अवतार धारण करुन समुद्र मंथनातून निघालेल्या अमृत कलशाचे राक्षसांपासून संरक्षण केले. या दिवशी व्रत करणारी व्यक्ती बुद्धिमान होते, तिचे व्यक्तिमत्त्व आकर्षित बनून तिची लोकप्रियता वाढते, असे मानले जाते. यंदा मोहिनी एकादशी बुधवार 15 मे रोजी आहे.
...म्हणून या एकदशीला मोहिनी एकादशी म्हटले जाते!
समुद्र मंथनाच्या शेवटी वैद्य धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. मात्र राक्षसांनी त्यांच्या हातातील अमृत कलश खेचून घेत तेथून पळ काढला. त्यानंतर ते आपापसात लढत राहिले. हा सर्व प्रसंग पाहत असलेल्या भगवान विष्णूने मोहिनी रुप धारण करुन राक्षसांकडून अमृत कलश काढून घेतला. तो दिवस होता वैशाख महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशीचा.
भगवान विष्णूंचा मोहिनी अवतार पाहुन राक्षस (दैत्य) मोहित झाले. त्यांनी आपापसातील भांडणं बंद केली आणि त्यांनी सर्वांच्या संमतीने देव-दैत्यांमध्ये अमृताचे समान वाटप करण्यासाठी कलश भगवान विष्णूंना दिला. त्यानंतर भगवान विष्णूंनी देव आणि दैत्यांना वेगवेगळ्या रांगेत बसायला सांगितले. मात्र मोहिनी रुपातील विष्णूवर भाळलेले दैत्य अमृताचा आस्वाद घेणे विसरुन गेले. तेव्हा भगवान विष्णूंनी देवतांना अमृतपान करण्यास सांगितले.
त्या दरम्यान राहु नावाच्या राक्षसाने देवतांचे रुप धारण करुन अमृतपानाचा आस्वाद घेऊ लागला. तेव्हा त्याचे खरे रुप प्रकट झाले. मग भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचे डोके धडापासून वेगळे केले. अमृताचा आस्वाद घेतल्यामुळे त्याच्या धडाचे आणि डोक्याचे दोन ग्रह झाले- एक राहू आणि दुसरा केतू.
मोहिनी एकादशीचे महत्त्व
मोहिनी एकादशीला पारंपारीक महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, सीतेच्या वियोगातील दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीरामाने मोहिनी एकादशीचे व्रत केले होते. इतकंच नाही तर युद्धिष्ठिर ने देखील दुःखातून मुक्त होण्यासाठी विधीवत हे व्रत केले होते.