Marbat Festival 2019: नागपूर शहरात मारबत महोत्सव उत्साह, नागरिकांकडून पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांच्या बडग्याचे दहन
Marbat Festival Nagpur | (Photo Credits: ANI)

Marbat Festival 2019: विदर्भातील लोकसंस्कृतीचा एक भाग असलेला आणि जगात एकमेव असलेला मारबत महोत्सव नागपूर (Marbat Festival Nagpur) येथे आज (शनिवार, 31 ऑगस्ट 2019) साजरा होत आहे. या महोत्सवास दहा, विस नव्हे तर तब्बल 100 पेक्षाही अधिक वर्षांची परंपरा आहे. या महोत्सवात विविध विषयांवर सादर केले जाणारे बडग्या लोकांचे लक्ष वेधून घेतात. यंदा तर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan Prime Minister Imran Khan), जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयास विरोध करणाऱ्यांचा बडग्या हा विशेष आकर्षण ठरत आहे. दरम्यान काळी आणि पिवळी मारबतचा इतवारीतील नेहरू पुतळा येथे मिलन होते.

काय आहे बडग्या आणि मारबत उत्सव?

मारबत उत्सवाचा संबंध महाभारतापर्यंत जोडला जातो. सांगितले जाते की, महाभारतामध्ये मायावी राक्षसी हिने भगवान श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी सुंदर स्त्रीचा वेष धारण करुन पुतना मावशीच्या रुपात गोकुळांत आली होती. मात्र, कृष्णाने तिला शोषून ठार मारले. कृष्णाच्या हातून मायावी राक्षसी ठार झाल्यानंतर गावकऱ्यांनी तिला गावाबाहेर काढले आणि जाळले. तेव्हापासून मारबत हा उत्सव सुरु झाल्याची दंतकथा सांगितली जाते. हा उत्सव साजरा केल्याने गावावरचे संकट टळले जाते, असे सांगतात.

दरम्यान, मारबत उत्सवात काळी आणि पिवळी अशा दोन पद्धतीच्या मारबत असतात. 'ईडा पीडा घेऊन जाऽऽ गे मारबत' असे म्हणत पिवळी मारबत काढली जाते. त्याचीही एक वेगळीच कहाणी सांगितली जाते. सांगतात की, बांकाबाई हिने पूर्वी ब्रिटिशांसोबत हातमिळवणी केली. या कृतीचा निषेध म्हणून. यात कागद आणि बांबू आदिंचा वापर करुन तयार केलेल्या पुतळ्याची तान्ह्या पोळ्याला (मुख्य बैलपोळ्याचा दुसरा दिवस) मिरवणूक काढतात. पुढे या पुतळ्याचे दहन केले जाते. (हेही वाचा, Ganeshotsav 2019: अष्टविनायकामधील पहिला गणपती 'मोरगावचा मोरेश्वर'; जाणून घ्या मंदिर, मूर्ती आणि पौराणिक महत्व)

एएनआय ट्विट

मिरवणूक मार्ग

नेहरू पुतळा, मारवाडी चौक, अमरदीप सिनेमा, शहीद चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, केळीबाग मार्ग, कोतवाली, गांधीद्वार, अग्रसेन चौक, गांजाखेत चौक, गोळीबार चौक, भारतमाता चौक या मार्गाने आलेली मारबत मिरवणूक नाईक तलाव येथे विसर्जीत करण्यात येते.

काय आहे बडग्या?

बांकाबाई हिच्या कृत्यास तिच्या नवऱ्यानेही विरोध अथवा निषेध केला नाही. त्यामुळे चिडलेल्या लोकांनी बांकाबाई हिच्या नवऱ्याच्या पुतळ्याचीही मिरवणूक काढायला सुरुवात केली. या पुतळ्याला बडग्या असे म्हटले जाते. बाडग्या हे वाईट शक्तीचे प्रतिक मानले जाते. बडग्याचे दहन म्हणजे गावावरील संकट आणि वाईट शक्तीचे दहन असे मानले जाते. या उत्सवासाठी (श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी) नागपूर शहर आणि विदर्भातील ग्रामिण भागातील अनेक नागरिक आपल्या मुलाबाळांना घेऊन येतात. वास्तव पाहता या उत्सवाला एकप्रकारे जत्रेचे स्वरुप लाभते. उत्सवाला होणारी गर्दी विचारात घेऊन मग खेळणी विक्रेते, विविध दुकानदार ही मंडळीसुध्दा स्टॉल लावतात. या उत्सवामुळे नागरिकांनाही आपल्या दैनंदिन कामातून काहीसा विरंगुळा लाभतो.