Marathwada Liberation Day | (Photo Credit: Archived, Edited, Representative Images)

Marathwada Liberation Day: भारताला 15 ऑगस्ट 1947 दिवशी स्वातंत्र्य मिळाले असले तरीही भारतामध्ये त्यावेळेस जुनागड, हैदराबाद आणि कश्मीर ही संस्थानं भारतामध्ये विलीनीकरण करण्याच्या तयारीत नव्हते. दरम्यान यापैकी हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाड्याचादेखील समावेश आहे आणि त्याला स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 नंतर पुढे 13 महिने वेगळा संघर्ष करावा लागला त्यानंतर मराठवाडा (Marathwada) मुक्त झाला आहे. 17 सप्टेंबर 1948 दिवशी हैदराबादचा निजाम शरण आला भारतामध्ये हैदराबाद विलीन झाले. आज संघर्षाला 72 वर्ष पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यातील जनतेसाठी भारताच्या स्वातंत्र्यदिना इतकाच महत्त्वाचा दिवस आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन (Marathwada Mukti Sangram Din) म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे.

मराठवाडा मुक्तिदिन आंदोलन

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची फाळणी झाली आणि 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन ओळखला जाऊ लागला. दरम्यान हैदरामध्ये आपले संस्थान मांडून बसलेल्या निजामाला मात्र स्वतंत्र भारताच्या मध्यभागी हौदराबाद संस्थान हे एक वेगळं राष्ट्र व्हावं अशी इच्छा होती. हैदराबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्हे, मध्यप्रदेशचा काही भाग, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसागडचा समावेश होता. या भागातून नागरिकांचा स्वातंत्र भारतामध्ये सामील होण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यावेळेस निजामाचा सेनापती सामान्य जनतेवर अत्याचार कारायला लागला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संघर्ष तीव्र झाला. हाच संग्राम मराठवाडा मुक्ती संग्राम होता. स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्याचं नेतृत्त्व केलं.

भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 दिवशी लष्करी फौजा निजामाच्या संस्थानामध्ये घुसवल्या. या कारवाईला पोलिस अ‍ॅक्शन असेही म्हणतात. अखेर 17 सप्टेंबरला निजाम भारत सरकारला शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये समविष्ट झाले. यामधील महाराष्ट्राच्या मराठवाड्यानेही स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला.

औरंगाबाद मध्ये मराठवाडा मुक्तीचा इतिहास चिरंतन राहावा म्हणून मुक्ती स्तंभ उभारण्यात आला आहे. मराठवाडा मुक्ती दिन संग्राम म्हणून या ठिकाणी दरवर्षी 17 सप्टेंबरला शासकीय कार्यक्रम केले जातात.