Mangalagaur 2020 Date: नवविवाहितांसाठी आनंदाची पर्वणी असणारी मंगळागौर यंदा कधी साजरी कराल? जाणून घ्या पूजेचे महत्त्व आणि विधी

सणवार, व्रतवैकल्यांनी भरलेला श्रावण महिना उत्साहवर्धक वाटतो. श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते. मंगळगौरीचे व्रत म्हणजे नवविवाहितेसाठी उत्साहाची, आनंदाची पर्वणीच. आपली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारे हे व्रत स्त्रीयांना रोजच्या जीवनापेक्षा काहीतरी वेगळ करण्याची संधी देते.

Mangalagaur 2020 Date: नवविवाहितांसाठी आनंदाची पर्वणी असणारी मंगळागौर यंदा कधी साजरी कराल? जाणून घ्या पूजेचे महत्त्व आणि विधी
Mangalagaur 2020 (Photo Credits: Instagram)

Mangalagaur Date & Puja Vidhi: सणवार, व्रतवैकल्यांनी भरलेला श्रावण महिना उत्साहवर्धक वाटतो. श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते. मंगळगौरीचे व्रत म्हणजे नवविवाहितेसाठी उत्साहाची, आनंदाची पर्वणीच. आपली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारे हे व्रत स्त्रियांना रोजच्या जीवनापेक्षा काहीतरी वेगळ करण्याची संधी देते. पूर्वीच्या काळी स्त्रियांचे जीवन चुलमूल इतपर्यंतच मर्यादीत होते. त्यामुळे अशा सणासभांना त्यांना नटण्या थटण्याची हौस पुरवता येत होती. मनसोक्त गप्पा गोष्टी करता यायच्या. खेळ रंगायचे. एकंदरीत काय तर सगळीकडे आनंदी आनंद. काळ बदलला असला तरी अद्याप ही परंपरा महाराष्ट्रात टिकून आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरुवातच मंगळवार पासून होत आहे. त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेसाठी 5 मंगळवार मिळत असून पहिला  मंगळवार 21 जुलै रोजी आहे.

लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे मंगळागौरीचे व्रत केले जाते. मंगळागौर हे आईने मुलीला लग्नानंतर दिलेले सौभाग्य व्रत असल्याचेही मानले जाते. नवविवाहितेला अखंड सौभाग्य व तिच्या सासर-माहेरास सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत केले जाते. या दिवशी पार्वती देवीची पूजा करुन जागरण केले जाते. जागरणात पारंपारिक खेळ खेळले जातात.

मंगळगौर साजरी करण्यासाठी दिवस:

पहिला मंगळवार 21 जुलै
दुसरा मंगळवार 28 जुलै
तिसरा मंगळवार 4 ऑगस्ट
चौथा मंगळवार 11 ऑगस्ट
पाचवा मंगळवार 18 ऑगस्ट

मंगळगौर पूजाविधी:

मंगळागौरीची पूजा करताना अन्नपूर्णा देवीची धातूची मूर्ती मांडतात त्याच्या शेजारी महादेवाची पिंड ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची पूजा केली जाते. त्यानंतर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडतो. हे भोजन शक्यतो मुक्याने करायचे असते. तसंच हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी आणि साखर सवाष्णींना दिली जाते. रात्रभर मंगळागौर जागवतात. त्यावेळी उखाण्यांचा कार्यक्रम रंगतो. तसंच फुगडया, झिम्मा, भेंडया असे विविध खेळ खेळले जातात. दुसऱ्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखवून मंगळागोरीची आरती म्हटली जाते. त्यानंतर अक्षता टाकून देवीचे विसर्जन करतात. लग्नानंतर पाच वर्ष मंगळागौरी साजरी केली जाते. त्यानंतर पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन करतात.

आपल्या अनेक सण सणसमारंभांवर यंदा कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे एकत्र जमून, नाचून, खेळून यंदा मंगळागौर साजरी करता येणार नसली तरी घरच्या घरी मंगळगौरीचे व्रत करुन आपली परंपरा अखंड ठेवा.

(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2020 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).