
Makar Sankranti 2021: मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. या सणाचा शेतीशीदेखील संबंध आहे म्हणून या दिवशी विवाहित महिला एकमेकींना शेतात आलेल्या धान्याचे वाण देतात. याशिवाय या दिवशी स्त्रिया साज-शृंगार करून मंदिरात जातात. तसेच हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. मकर संक्रातीचा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. यंदा हा सण 14 जानेवारीला साजरा होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. 21-22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थातचं त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात. या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. पंचांगानुसार, मकरसंक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. (हेही वाचा - Haldi Kumkum Mehandi Design: हळदी कुंकूवाच्या दिवशी हातावर काढा या सुंदर मेहंदी डिझाइन )
मकर संक्रांती शुभ मुहूर्त -
यावर्षी मकर संक्रांतीला पूजा करण्यासाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.46 ही वेळ शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत पूजाविधी करू शकता. इंग्लिश महिन्यानुसार, हा दिवस बहुधा 14 जानेवारी रोजी येतो. परंतु, एखाद्या वर्षी ही तारीख मागे-पुढे होते. हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली जाते. पौराणिक कथेनुसार, ही देवता दरवर्षी येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते.
मकर संक्रांती महत्त्व -
मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच महत्वाचे ग्रह एकत्रित येतात. या दिवशी सूर्य, शनि, गुरु, बुध व चंद्र मकर राशीत राहतील. जे शुभ योग निर्माण करतात. म्हणूनचं या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य, आनंद व समृद्धी आणते. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता आहे. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातमागचा हेतू असतो. म्हणून या दिवशी तिळगूळ देण्याची प्रथा आहे.
मकर संक्राती पूजाविधी -
मकर संक्रातीच्या दिवशी अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता. नंतर विवाहित स्त्रियांनी सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी भरावे. हे सुगड पाटावर ठेवावे आणि त्या भोवती रांगोळी काढावी. यातील एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावा. त्यानंतर किमान पाच सवाष्णींना वाण-वसा करावा. या दिवशी हळदीकुंकू समारंभ करून तिळगूळ वाटावेत. तुम्ही मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ करू शकता.