
Maharashtra State Martyrs Memorial Day: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 107 हुताम्यांनी बलिदान दिल्यानंतर मुंबई सह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. दरम्यान 1 मे1960 दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली असल्याने 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) म्हणून साजरा केला जातो. तर 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन (Maharashtra Rajya Hutatma Smruti Din) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या 107 जणांच्या स्मरणाचा आजचा दिवस. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री, कॅबिनेट मिनिस्टर आदित्य ठाकरे राज्य मंत्री अदिती तटकरे, पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दक्षिण मुंबई मध्ये हुतात्मा स्मारकावर जाऊन आपली आदरांजली अर्पण केली आहे.
महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिन का साजरा केला जातो?
1960 साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून मुंबई सह महाराष्ट्र राज्य अस्तित्त्वात आले. पण पुढे हे बलिदान विस्मरणात जाऊ नये म्हणून महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी सरकार कडे मागणी करून महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2000 पासून हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली.
हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये 1965 साली हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये या '107' हुतात्मांनी दिले होते बलिदान!
हुतात्म्यांच्या बलिदानाचा इतिहास
राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई न देण्याचं सांगितल्याने महाराष्ट्रात असंतोष होता. मात्र सामान्यांना, महाराष्ट्रातील जनतेला मुंबई सह महाराष्ट्र हवा होता. 21 नोव्हेंबर 1956 दिवशी फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये या मागणीसाठी विशाल मोर्चा निघाला होता. फोर्ट भागात त्या वेळेस संचारबंदी असूनही मोठ्या प्रमाणात लोकं जमल्याने सत्याग्रहींवर लाठीमार करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर 'दिसताक्षणी गोळ्या घाला' असे आदेश दिले होते. त्यामुळे फ्लोरा फ्लाऊंटन परिसरात गोळीबार झाला आणि पुढे वर्षभरात 107 जणांचे जीव गेले.