Lalbaugcha Raja 2019 Ganesh Pandal Aarti : ज्याच्या आगमनाची अवघा महाराष्ट्र वाट पाहत होता ते गणराय अखेर वाजत गाजत, मोठ्या उत्साहात घरी विराजमान झाले. यात घरातील गणपतींसोबत मुंबईतील गल्लोगल्लीही गणपती बाप्पा विराजमान झाले. यात मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव या भागातील मानाचे गणपती बाप्पा आणि त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांगा हा सध्या चर्चेचा विषय असतो. पुढील 12 दिवस संपूर्ण मुंबई गणेश भक्तांनी न्हाऊन निघालेली दिसेल. यात 'लालबागचा राजा' (Lalbaugcha Raja) म्हणजे देश-विदेशातील अनेक गणेश भक्तांचे श्रद्धास्थानच जणू. या राजाच्या दर्शनासाठी रात्रंदिवस रांगा लावतात. आपल्या राजाला डोळे भरून पाहता यावे आणि त्याच्या भक्तीत लीन होता यावे ही एकच भावना यामागे असते.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ यंदा 86 वा गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाची गणेशभक्तांच्या सोयीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या वर्षी लालबागचा राजा मंडपाची सजावट आणि देखावा इस्त्रोच्या 'चांद्रयान 2' या चंद्रमोहिमेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. यामध्ये बाप्पाच्या आसपास हलणारे आंतराळवीर विशेष आकर्षण आहे. प्रत्यक्ष लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ न शकणार्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दर्शन खुलं करण्यात आलं आहे. लालबागच्या राजाच्या अधिकृत वेबसाईटसह, फेसबूक, ट्विटर अकाऊंट च्या माध्यमातून लाईव्ह दर्शन, मंडपातील आरती पाहता येईल.
येथे पाहा लालबागच्या राजाची लाइव्ह आरती:
'नवसाला पावणारा गणपती' अशी ओळख असणार्या या गणपतीच्या दर्शनाला दरवर्षी लाखो गणेशभक्त हमखास भेट देतात. त्यात अनेक दिग्गज नेते, सिनेकलाकार, क्रिडा, कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी यांचाही सहभाग असतो.