Krishna Janmashtami 2020 Date: श्रावण कृष्ण अष्टमी च्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जातो. दरम्यान भारतामध्ये सर्वत्र भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव हा कृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो तर त्याच्या दुसर्या दिवशी गोपाळकाला साजरा करण्याची पद्धत आहे. हा उत्सव दहिकाला उत्सव म्हणून देखील ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने वृंदावन, गोकूळ, मथुरा, द्वारका, जन्नाथपुरी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे श्रीकृष्ण जन्मोत्सव हा 11 ऑगस्ट तर गोपाळकाला हा 12 ऑगस्ट दिवशी साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रामध्ये गोपाळकाला दिवशी दहीहंडी चा खेळ मोठ्या स्वरूपात खेळला जातो. मात्र यंदा कोरोना संकटामुळे या उत्सवाचं आयोजन रद्द झाले आहे. तर मंदिरं बंद असल्याने श्रीकृष्ण जन्मोत्सव मंदिरांऐवजी घरा-घरात साजरा केला जाणार आहे.
श्रीकृष्ण जन्मोत्सवादिवशी दिवसभर उपवास केले जातात. रात्री कृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. त्यामुळे यंदा 11 ऑगस्ट दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यासाठी उपवास ठेवले जाणार आहेत तर 12 ऑगस्टला या व्रताची सांगता होईल. श्रावण कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री हरिनामाचा जप, कीर्तन, नृत्य, गायन असे कार्यक्रम केले जातात. याच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी तसेच धर्मस्थापनेसाठी प्रत्येक युगामध्ये श्रीकृष्ण जन्म घेईल अशी हिंदु धर्माची मान्यता आहे. दरम्यान श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा अवतार आहे.
कौरव -पांडवांच्या युद्धामध्ये कृष्णाने अर्जुनाला कर्तव्य आणि कर्म संबंधाने अमुल्य उपदेश केला होता. तो उपदेश भगवतगीता म्हणून ओळखला जातो. संपूर्ण जगभरात भगवतगीता हा पवित्र ग्रंथांपैकी एक मानला जातो. त्याचं पूजन केले जातं. भगवतगीतेची शिकवण श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने जनमाणसांमध्ये रूजवण्याचा प्रयत्न केला जातो.