कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2020) म्हटली की लहानग्यांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये प्रचंड उत्साह दिसतो. याला खास कारण म्हणजे या रात्री दिले जाणारे मसाले दूध. तसं मसाले दूध आपण कधीही बनवून पिऊ शकतो. मात्र कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या (Blue Moon) शितल छायेत बसून आपल्या जवळच्या लोकांसोबत बसून हे दूध पिण्यात काही वेगळीच मजा असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला नैवेद्य म्हणून हे दूध (Masala Milk) दाखवले जाते आणि त्या दूधात चंद्राचा लख्ख प्रकाश आणि शितल छाया पडल्यानंतर ते दूध सर्वांमध्ये वाटले जाते. यंदा कोरोना व्हायरसमुळे आपल्याला एकत्रित येऊन हा सण साजरा करता येणार नाही. मात्र आपल्या घरातल्या मंडळींसोबत अगदी थोडक्यात आपण ही रात्र एन्जॉय करु शकता.
दरवर्षी आपण कोजागिरी निमित्त बनवलेले मसाले दूध चंद्राच्या छायेखाली ठेवून त्यात चंद्र पाहतो आणि ते दूध पितो. पण यामागे मोठे शास्त्रीय कारण दडलेले आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहित आहे. या दूधाचा आपल्या शरीरावर खूप मोठा आरोग्यदायी परिणाम होतो. त्यामुळे यामागे काही पुराणकथा आहे असे जर तुम्हाला वाटत असल्यास तसे नसून त्यामागे शास्त्रीय कारण आहे.
जाणून घ्या या मागील शास्त्रीय कारण
असं म्हणतात की ऋषिमुनींनी हे जाणले होते की की कोजागिरी पौर्णिमेची चंद्राची किरणे ही शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला या कोमल, शांत, आल्हाददायक चंद्र किरणांचा अनुभव घेण्यासाठी सर्वजण एकत्र येतात व जागरण करतात. हा प्रकाश जो जितका घेईल तितका तो समृद्ध होईल असेही सांगण्यात येते. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची शक्ती आहे. ही शक्ती चंद्राच्या आकारासोबत वाढत जाते. त्यामुळे असा हा शक्तिशाली चंद्र दूधात पाहिल्यास त्यातही ती शक्ती एकवटून जाते. दूध हे आरोग्यदायी असे पेय आहे. हे पेय आपण प्यायल्यास ती शक्ती आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. थोडक्यात सांगायचे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र किरणांची शक्ती वातावरणात असते आणि जसा चंद्राचा क्षय होतो तशी ही शक्तीही कमी कमी होत जाते.
यावर्षी कोरोनामुळे आपल्याला आपले सण मोठ्या जल्लोषात साजरे करता आले नाही. मात्र यावर्षी एक चांगला बदल झाला तो म्हणजे कोणताही सण हा धांगडधिंगा न करता अगदी शांतपणे साजरा होत आहे. जे पर्यावरणाच्या दृष्टीने देखील हितावह आहे. नाही का!