पावसाळा संपला की पहिली पौर्णिमा येते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima). आकाशात काळ्या कुट्ट ढगाळ वातावरणाचे साम्राज्य संपल्यानंतर या पौर्णिमेला येणारी चंद्राची किरणे मनाला सुखवतात. या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दस-यानंतर कोजागिरी साजरी करतात. वैज्ञानिकदृष्ट्या कोजागिरीच्या दिवशी चंद्रकिरणे शितल असतात. त्यामुळे या किरणांना दूधात पाहणे हे देखील शास्त्रीयदृष्ट्या महत्वाचे आहे.
कोजागिरी म्हटलं की आपल्यासमोर येते ती मसालेदार दूध. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करुन रात्री 12 नंतर दूधात चंद्र पाहून ते दूध आपण पितो. पण आपल्यापैकी कित्येकांना असा प्रश्न पडला आहे का की दूधातच हा पौर्णिमेचा चंद्र पाहण्याचे कारण काय? तर त्यामागे केवळ पुराणकथा नसून शास्त्रीय कारणही आहे. जाणून घेऊया ते मुख्य शास्त्रीय कारण
असं म्हणतात की ऋषिमुनींनी हे जाणले होते की की कोजागिरी पौर्णिमेची चंद्राची किरणे ही शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला या कोमल, शांत, आल्हाददायक चंद्र किरणांचा अनुभव घेण्यासाठी सर्वजण एकत्र येतात व जागरण करतात. हा प्रकाश जो जितका घेईल तितका तो समृद्ध होईल असेही सांगण्यात येते. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची शक्ती आहे. ही शक्ती चंद्राच्या आकारासोबत वाढत जाते.
त्यामुळे असा हा शक्तिशाली चंद्र दूधात पाहिल्यास त्यातही ती शक्ती एकवटून जाते. दूध हे आरोग्यदायी असे पेय आहे. हे पेय आपण प्यायल्यास ती शक्ती आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत अमृतदायी ठरते. थोडक्यात सांगायचे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र किरणांची शक्ती वातावरणात असते आणि जसा चंद्राचा क्षय होतो तशी ही शक्तीही कमी कमी होत जाते.
परंतू जसजसा काळ बदलत गेला तसतसे कोजागिरीचे महत्वही बदलून गेले. सध्याच्या काळात कोजागिरी म्हणजे दूध पिणे, एकत्र येऊन मजा करणे, धांगडधिंगा करणे. इतकंच काय, तर लोकांनी आपल्या सोयीप्रमाणे चक्क कोजागिरी पौर्णिमेचा दिवसही बदलून टाकला आहे. सध्याची कोजागिरी पौर्णिमा ही फक्त शनिवार किंवा रविवारीच येते. लोकांना रात्रभर मजा करता यावी आणि दुस-या दिवशी आराम करता यावे यासाठी निवडलेला हा पर्यायी दिवस. अहो पण यामुळे कोजागिरीचा मूळ उद्देश हरवत चाललाय. मग कुठून मिळेल तुम्हाला त्या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश आणि त्या किरणांची शक्ती. हे बोलणं जरी खोचक वाटत असलं तरी हे सत्य आहे; पाहा थोडा विचार करुन.