Holi 2022: होळीचा सण जवळ आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या साथीच्या आजारामुळे हा उत्सव फक्त आभासी स्वरुपात साजरा करण्यात येत आहे. मात्र, आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी परिस्थिती वेगळी असणार आहे. लोक होळीचा सण साजरा करण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. यावेळी प्रत्येकाला होळी खेळतानाचे फोटो किंवा व्हिडिओ शूट करण्याचा मोह आवरता येत नाही.
तुम्ही रंग किंवा पाण्याने होळी साजरी करत असाल तर तुम्हाला तुमचा मौल्यवान स्मार्टफोन सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. होळी खेळताना स्मार्टफोन न बाळगण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो. मात्र, अनेकांना स्मार्टफोन घरात ठेवणं आवडतं नाही. (वाचा - Happy Holi 2022 Wishes & HD Images: होळी निमित्त WhatsApp Stickers, Quotes, Colourful Wallpapers, SMS द्वारे मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा!)
होळी खेळताना तुम्ही तुमचे गॅझेट सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी करू शकता. आम्ही येथे तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहावा यासाठी काही कल्पना सांगितल्या आहेत. चला तर मग यासंदर्भात जाणून घेऊयात...
स्मार्टफोनसाठी पारदर्शक जलरोधक पिशवी वापरणे -
होळी दरम्यान तुमची गॅझेट सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाणी-प्रतिरोधक पिशवी वापरणे. या पारदर्शक जलरोधक पिशव्या पाणी, धूळ आणि इतर कणांपासून तुमच्या स्मार्टफोनचे संरक्षण करतात. तुम्ही तुमच्या शेजारच्या मोबाईल स्टोअरमध्ये जाऊन ही पिशवी खरेदी करू शकता.
पारदर्शक टेप -
स्मार्टफोनची छिद्रे सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. या छिद्रांवर तुम्ही पारदर्शक टेप लावू शकता. यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाणी, कोरडे रंग जाणार नाही. हा टेप तुमच्या स्मार्टफोनमधील चार्जिंग पोर्ट्स, स्पीकर ग्रिल्समध्ये पाणी जाण्यापासून रोखेल.
'हे' लक्षात ठेवा -
ओल्या स्मार्टफोनला सुकवण्यासाठी ड्रायर वापरू नका -
स्मार्टफोनमधील अनेक घटक अतिशय नाजूक असतात, त्यामुळे जर तुम्ही फोन सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरत असाल तर ते अजिबात करू नका. याशिवाय स्मार्टफोनचे मागील पॅनल हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे वितळू शकते.
बायोमेट्रिक लॉकऐवजी पिन वापरा -
होळीच्या पार्टीला जाण्यापूर्वी, फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉकसारख्या बायोमेट्रिक लॉकऐवजी फोनवर तुमचा पिन, पासवर्ड किंवा पॅटर्न सेट करा. कारण फोनचे फेस अनलॉक फीचर तुमचा रंगीत चेहरा ओळखू शकणार नाही.
तुमचा फोन ओला असताना किंवा तुम्ही तो नुकताच पाऊचमधून बाहेर काढल्यावर चार्ज करू नका. स्मार्टफोन ओला झाल्यास हेअर ड्रायर वापरणे टाळा.