Kartik Purnima 2018 : कार्तिक पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळीचे महत्त्व काय ?
कार्तिक पौर्णिमा Photo Credit : Instagram

Kartik Purnima 2018 : कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) त्रिपुरा पौर्णिमा (Tripuri Purnima)  म्हणून देखील ओळखले जाते. यादिवशी देव दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. आपल्या प्रत्येक सण आणि संस्कृती मागे खास उद्देश असतो. कार्तिक पूर्णिमादेखील आपल्याला दान धर्माची शिकावण देते. देशभरात विविध नावांनी कार्तिक पौर्णिमा ओळखली जाते. यंदा देशभरात २३ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima)  साजरी केली जाणार आहे.

कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व काय ?

कार्तिकी पौर्णिमेदिवशी (Kartik Purnima)  शंकर भगवानांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केल्याची आख्यायिका आहे. या दिवसाला त्रिपुरा पौर्णिमा असेदेखील म्हटलं जातं. या दिवशी भगवान शंकराची खास आराधना केली जाते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली जाते. कार्तिकी पौर्णिमेदिवशी देखील दीपदान करण्याची प्रथा आहे.

कार्तिकी पौर्णिमेच्या संध्याकाळी भगवान विष्णूंनी 'मत्स्यावतार' घेतल्याचं म्हटलं जात. म्हणूणच कार्तिकी पौर्णिमेच्या संध्याकाळी विष्णूदेवाची पूजा केली जाते. गंगा नदीच्या किनारी दीप दान केल्याने दहा यज्ञाइतके पुण्य मिळते असे म्हटले जाते. अनेक भाविक गंगा नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी येतात. त्यानंतर दान धर्म केले जातात. यामध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि धान्यांचे दान करणं शुभ असल्याचे म्हटले जाते.

शंकराप्रमाणेच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कार्तिकी पौर्णिमेदिवशी पिंपळाच्या झाडाला दूध -पाण्याचा अभिषेक केला जातो. या दिवशी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करत असल्याचेही म्हटले जाते.