
हिंदू धर्मियांसाठी पवित्र श्रावण (Shravan Maas) महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्यांची रेलचेल असते. यामध्ये श्रावणी सोमवर असतात, मंगळवारी सवाष्णांसाठी मंगळागौर असते तर शुक्रवारी जरा जीवंतिका (Jara Jivantika) देवीची पूजा केली जाते. संततीप्राप्तीसाठी ही पूजा लाभदायक असते. मुलांचे रक्षण व्हावे यासाठी श्रावणातल्या शुक्रवारी स्त्रिया जरा जिवंतिकेची मनोभावे पूजा करतात. या देवीचे पूजा केल्याने जरा जिवंतिका देवी आपल्या बाळावर प्रसन्न होऊन त्याचे रक्षण करेल, अशी महिलांची श्रद्धा आहे.
जरा जिवंतिका देवीच्या उपासनेच्या तारखा
जिवंतिका देवीची पूजा शुक्रवारी केली जाते. यंदा श्रावण महिन्यात 9 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 30 ऑगस्ट दिवशी केली जाणार आहे. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते. नक्की वाचा: Shravani Somvar 2024 Dates: महाराष्ट्रात श्रावणी सोमवार व्रत यंदा 5 ऑगस्टपासून; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?
जरा जिवंतिका देवी व्रताचं महत्त्व
जरा जिवंतिका देवी ही घरातील लहान मुलांची रक्षण करणारी देवी आहे. पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, जरा ही एक राक्षसीण होती. ती मगध देशांत वास्तव्यास होती. मगध मधील नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. त्यामुळे त्याला जन्मताच नगराबाहेर फेकून देण्यात आले. यावेळी जरा राक्षसीने त्या बाळाच्या शरीराचे जे दोन भाग झाले होते ते जुळवले आणि त्याला जीवदान दिले. तो बालक 'जरासंध' म्हणून ओळखले जाऊ लागले. मग पुढे जाऊन मगध देशात जरा राक्षसीणेचा मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला. तेथील लोक तिला सर्व मुलांची आई समजू लागली. आपल्या मुलांच्या रक्षणासाठी तिची पूजा करायला सुरूवात झाली.
कसं कराल जरा जिवंतिका व्रत ?
आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावा किंवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे.
टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहले असून त्यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी लेटेस्टली मराठी करत नाही. तसेच अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.