Janmashtami 2023: भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार द्वापार युगात या तिथीला मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात होत असल्याने जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथीचा विशेष विचार केला जातो. पंचांगानुसार यावर्षी रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथीमुळे जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्ताबाबत संभ्रम आहे. अशा परिस्थितीत 2023 मध्ये जन्माष्टमी कधी साजरी होणार आहे, त्यासाठी शुभ मुहूर्त आणि उपासनेची पद्धत काय आहे हे जाणून घेऊया?
यंदाची श्रीकृष्णा जन्माष्टमी कधी आहे?
देशात सप्टेंबरच्या ६ आणि ७ तारीखेला श्रीकृष्णा जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. ७ सप्टेंबरला देशभरात ठिकठिकाणी दही हंडी फोडली जाणार आहे. द्रुक पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३७ वाजता सुरू होईल. तसेच ही तारीख 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4.14 वाजता संपेल. पंचांगानुसार रोहिणी नक्षत्र ६ सप्टेंबरला दुपारी ३.३७ वाजता सुरू होईल. तर हे नक्षत्र 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10.25 वाजता समाप्त होईल.
जन्माष्टमीचा पूजेचा शुभ मुहूर्त कोणता
श्रीकृष्णा जन्माष्टमीचा दिवशी निशिता पूजेला फार महत्त्व दिले जाते. निशिता पूजेच्या वेळी बाळगोपाळाला पाळण्यात ठेवले जाते. यंदा निशिता पूजेचा कालावधी हा ४६ मिनीटांचा आहे. ७ सप्टेंबरच्या सकाळी १२.१४ वाजता सुरु होणार आणि १.०० वाजता संपणार आहे.
जन्माष्टमी 2023 पूजा विधी
जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून स्नान करावे. यानंतर घरातील पूजास्थान स्वच्छ करा. यानंतर पूजा मंदिरात देवतांच्या समोर दिवा लावावा. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची म्हणजेच लाडू गोपाळाची पूजा केली जाते. अशा स्थितीत या दिवशी लाडू गोपाळांना माखन-दुधाचा अभिषेक करावा. मग लाडू गोपाळला झुल्यात बसवून प्रेमाने झुलवा. यासोबतच लाडू गोपाळांना लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. मध्यरात्री श्रीकृष्णाची विशेष पूजा करा. यानंतर त्यांची आरती करावी.
जन्माष्टमीचे महत्त्व
देशभरात श्री कृष्णा जन्माष्टमी सण मोठ्या धुमधड्याक्यात साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा एक ऐतिहासिक सण आहे. भारतातील महाराष्ट्रात,उत्तर प्रदेशात आणि गुजरात मध्ये मोठ्या गुण्यागोविंदाने हा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाचे भक्त उपवास करतात आणि देवाची सेवा करतात. विशेषता या दिवशी भगवान श्री कृष्णासाठी मंदिका किंवा घरात पूजा करतात, प्रार्थना आणि भजन देखील म्हणतात. खास करून या दिवशी भक्त कृष्णाने लिहलेल्या भगवद्ग गीतेचे पठण करतात. हा सण सर्वांना एकोप्याने राहण्याचा शिकवणी देतो.