International Men's Day 2019: भारत देश हा पुरुषप्रधान देश आहे असे आपण नेहमीच म्हणत आलो आहोत. समाजात महिलांवर होणारे अत्याचार, गुन्हे, चोरीच्या घटना यामुळे पुरुषांची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन होत चालली आहे. मात्र समाजात सर्वच पुरुष हे याच प्रवृत्तीचे असतात असेही नाही. लोकांना अशी कृत्ये करणारा क्रूर पुरुष दिसतो मात्र आपल्या घरासाठी, कुटूंबासाठी रात्रंदिवस राबणारा, कष्ट करणारा हाच पुरुष ब-याचदा पडद्यामागे राहतो. पुरुष हे उलट्या काळजाचे असतात असेही अनेकांचे म्हणणे असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा एका पुरुषाची ओळख करुन देणार आहोत ज्याने पुरुषांमध्येही माया, ममता, त्याग आणि मुख्य म्हणजे माणुसकी अजूनही शिल्लक आहे याचा उत्तम आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे.
पीढीजात केशकर्तनाचा व्यवसाय करणा-या आणि भांडूपमध्ये स्वत:चे सलून चालविणा-या हा केशकर्तनकार याला समाजसेवा करण्याचा ध्यास लागला आणि या ध्यासाने पछाडून निघालेल्या या अवलियाने समाजातील गोरगरिबांचे मोफत मुंडन करण्याचे ठरवले. या अवलियाचे नाव आहे रविंद्र बिरारी (Ravindra Birari). चला तर मग पाहूया काय आहे त्याचे हे समाजसेवेचे व्रत आणि जाणून घेऊया तो खडतर प्रवास
रविंद्र बिरारी हे टिटवाळ्यामध्ये राहत असून त्याचे भांडूपमध्ये केशकर्तनालय आहे. (Hair Salon) असे असतानाही त्यांना ही समाजसेवा का करावीशी वाटली हा सर्वांना प्रश्न पडला असेल. तर रविंद्र बिरारी काही वर्षांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशनमध्ये ट्रेनची वाट पाहत बसले होते तेव्हा त्यांच्या समोर काही भिकारी , केस वाढलेले, कपडे मळकटलेले अशा अत्यंत वाईट अवस्थेत बसलेले दिसले. त्यांना पाहून रविंद्रच्या मनात विचार आला की या लोकांना काही खायला देण्यापेक्षा त्यांना चांगलं आयुष्य देण्यासाठी आपल्याला काय करता येईल. संत गाडगेबाबा आणि बाबा आमटे यांना आपले आदर्श मानणा-या रविंद्र बिरारी यांनी त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्यात असलेल्या केशकर्तनाच्या माध्यमातून या गोरगरीबांना चांगले आयुष्य देण्याचे ठरविले. असा सुरु झाला त्यांचा प्रवास.
हेदेखील वाचा- International Men's Day: पुरुषांना चिरतरुण दिसण्यास मदत करतील हे '4' घरगुती उपाय
रविंद्र हे गेल्या साडे सात वर्षांपासून हे काम करत असून आतापर्यंत त्यांनी 1700 हून अधिक गरीब लोकांचे त्यात स्त्रिया आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे इतक्या लोकांचे मुंडन केले आहे. आपल्याला वाटेल हे काम खूप सोपे असेल पण प्रत्यक्षात तसे नसून हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. यात त्यांना सुरुवातीला या दरिद्री अवस्थेत असलेल्या भिका-यांनी त्यांना हटकले तर काहींचा त्यांना मारही खावा लागला मात्र रविंद्र यांनी धीर सोडला नाही आणि आपले काम सुरुच ठेवले. नंतर आपल्या बोलण्यातून, कृतीतून त्यांनी या गरीब लोकांशी संवाद साधला आणि त्यांचे मुंडन करण्याचे काम थोडे सोपे होत गेले.
यात त्यांना असेही लोक आढळले ज्या लोकांनी गेल्या 2-3 वर्षांपासून केस कापले नाही की धुतले नाही, त्या लोकांचे केस कापत असताना त्यांना उवा आणि वेगळ्या प्रकारचे किडेही आढळले. यात काहींच्या केसांतील या किड्यांमुळे एका क्षणाला रविंद्र 6 दिवस तापाने फणफणले होते. मात्र सुदैवाने ते या आजारातून बचावले. यावेळी त्यांच्या कुटूंबातील काही लोकांनी सुरुवातीला या गोष्टीला खूप विरोध केला मात्र रविंद्र यांनी आपले समाजकार्य करणे थांबवले नाही.
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे, 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा' या अभंगाचा खरा प्रत्यय येतो ते रविंद्र बिरारी सारख्या लोकांकडे पाहून. रविंद्र बिरारी यांच्या या महान कार्याला लेटेस्टली मराठीचा सलाम आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. तसेच समस्त पुरुषवर्गाला जागतिक पुरुष दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.