International Men's Day (Photo Credits: File image)

त्याने रडू नये... त्याने नेहमी रक्षक भूमिकेत असावं.. त्याने गाडीचं दार उघडावं... त्याने गच्च भरल्या लोकलमध्ये तिला आपली जागा द्यावी..हॉटेल मध्ये गेल्यावर बिलाचे पैसे भरावे.. त्याने असं करावं.. तसं करू नये आणि अशी अनेक बंधनं पाळूनही तुम्हा 'पुरुषांना' काय कळणार ? हे टोमणे ऐकावेत.. कितीही नाकारलं तरी आपल्या आजूबाजूच्या पुरुष मंडळींनी असंच वागावं अशी अनेकांची अपेक्षा असते. स्त्री वर होणारे अन्याय समोर आणताना (त्याची गरज निश्चितच आहे) समाजातील तेवढाच महत्वाचा पुरुष वर्ग अनेकदा अनावधानाने आपल्याकडूनही डावलला जातो. अशाच बाजूला सारल्या गेलेल्या पुरुषांच्या सन्मानासाठी दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी जागतिक पुरुष दिन (International Men's Day) साजरा केला जातो.

जगातील 70 देशांमध्ये हा दिवस साजरा करण्याची पद्धत आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे यात भारताचा ही समावेश आहे. यंदा हा दिवस साजरा करण्याआधी यामागील इतिहास तसेच यंदाची थीम सविस्तर जाणून घेऊयात..

जागतिक पुरुष दिन इतिहास

अमेरिकेच्या मिसौर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर थॉमस योस्टर यांच्या प्रयत्नांतून 7  फेब्रुवारी 1992 अमेरिका, कॅनडा आणि काही युरोपीय देशांनी एकत्र येऊन जागतिक पुरुष दिन साजरा केला होता. मात्र यानंतर प्रत्येक देश विविध दिवशी हा दिवस पाळू लागला. मात्र 1998 मध्ये त्रिनिदाद और टोबैगो या देशातील डॉ. जीरोम तिलकसिंह यांच्या पुढाकाराने हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 19 नोव्हेंबर हा दिवस निवडण्याचे कारण असे की, याच दिवशी या देशाची फुटबॉल टीम पहिल्यांदा विश्वचषकात क्वालिफाय झाली होती. तसेच हा दिवस डॉ. जीरोम यांचा जन्मदिवस  देखील आहे.

दुसरीकडे भारतात 'सेव इंडियन फॅमिली' या संस्थेतर्फे २००७ साली जागतिक पुरुष दिन हा भारतात साजरा करण्याची पद्धत सुरु करण्यात आली. यापाठोपाठ 'ऑल इंडिया मेन्स वेल्फेयर असोसिएशन' तर्फे भारतात महिला विकास मंत्रालयासोबतच पुरुष विकास मंत्रालय देखील स्थापन करण्याची मागणी देखील करण्यात आली.

जागतिक पुरुष दिन 2019 थीम

प्रतिवर्षीप्रमाणे यंदा 19 नोव्हेंबर रोजी भारतात या दिवसाचे सेलिब्रेशन होणार असून यंदा "पुरुष आणि मुलांसाठी बदल घडवणे" ही थीम असणार आहे. internationalmensday.com च्या माहिती नुसार, या दिवशी पुरुष आणि मुलांना शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी प्रत्यक्ष मदत व्हावी तसेच आयुष्यात सकारात्मकता पाळणाऱ्या आदर्श पुरुषांचे दर्शन घडावे अशी अपेक्षा आहे. या गुणांचा प्रसार सर्व पुरुषांमध्ये झाल्यास एक उत्तम जगाचे निर्मिती करता येईल असा विश्वास देखील या संस्थेने व्यक्त केला आहे.

दरम्यान, दुर्दैवाने हा दिवस महिला दिनाच्या इतका प्रचलित नाही, अनेकदा पुरुषांना सुद्धा या दिवसाची फार माहिती नसते, यंदाच्या या खास दिवशी तुमच्या आयुष्यात भाऊ, बाबा, नवरा, मित्र, प्रियकर अशा अनेक भूमिका पार पडणाऱ्या पुरुषांना स्पेशल फील करून देण्याची ही संधी दवडू नका.