International Day of the Girl Child: 'बेटी बचाव बेटी पढाओ' ते सुकन्या समृद्धी योजना, मुलींचे शिक्षण ते आरोग्य जपण्यासाठी भारत सरकार राबवतंं या '5' महत्त्वाच्या योजना
International Day of the Girl Child 2019 | Photo Credits: Pixabay.Com

International Day of the Girl Child 2019: जगभरात बालिका, महिला, स्त्रिया यांचा सन्मान करण्यासाठी एक खास दिवस राखून ठेवलेला आहे. आज 11 ऑक्टोबर हा त्यापैकीच एक दिवस आहे. International Day of the Girl Child किंवा World Girl Child Day म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची घोषणा केली आहे. 2012 साली पहिल्यांदा International Day of the Girl Child साजरा करण्यात आला. जगभरात बालिका, मुलींना सामना कराव्या लागणार्‍या अनेक लहान-मोठ्या समस्यांबाबत जागृती करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जभरात अजूनही मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं. मुलींना सामाजिक स्तरावर, आर्थिक स्तरावर मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाता यावं याकरिता भारत सरकार विशेष योजना राबवते. त्यामुळे तुमच्या घरातही एखादी चिमुकली असेल तर भविष्यासाठी 'या' योजनांची तुम्हांला माहिती असणं फायदेशीर ठरू शकतं.

मुलींच्या सबलीकरणासाठी भारत सरकार कोणत्या योजना राबवतात?

बेटी बचाव बेटी पढाओ

मुलींच्या निभावासाठी, संरक्षणासाठी व सबलीकरणासाठी 22 जानेवारी 2015 ला बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाला सुरुवात झाली. महिला कल्याण योजनांसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. पक्षपाती लिंगनिवडीची प्रक्रिया टाळणे, मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे, मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सुकन्या समृद्धी योजना

मुलींचे शिक्षण ते लग्न याचं आर्थिक व्यवस्थापन करणारी एक योजना म्हणजे 'सुकन्या समृद्धी योजना' आहे. यामध्ये तुम्ही दरमहा 250 रुपये ते दीड लाखापर्यंतची रक्कम तुमच्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावाने असलेल्या सुकन्या समृद्धी खात्यात जमा करू शकता. मॅच्युरिटी काळानंतर ही रक्कम चांगल्या व्याजासह तिच्या शिक्षण अथवा लग्नासाठी वापरू शकता. खाते उघडलेल्या दिवसापासून 21 वर्षे पूर्ण झाली की त्याचा आर्थिक फायदा घेता येतो. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.  

बालिका समृद्धी योजना

दारिद्र्य रेषेखाली राहणार्‍या बालिका आणि तिच्या आईसाठी 'बालिका समृद्धी योजना ' ही एक स्कॉलरशीप आहे. शिक्षणाचा आणि दैनंदिन खर्च भागवण्यासोबतच मुलींना बालविवाहापासून दूर ठेवण्यासाठी या योजनेमुळे मदत होते. यामध्ये इयत्ता 10 वी पर्यंत मुलींना किमान 300 ते 1000 रूपयांची स्कॉलरशीप दिली जाते. ग्रामीण आणि शहरी भागात ही योजना उपलब्ध असून कुटुंबातील एका मुलीसाठी याचा फायदा घेतला जाऊ शकतो.  शहरी आणि  ग्रामीण   भागातील या योजनेबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

माझी कन्या भाग्यश्री

माझी कन्या भाग्यश्री ही योजना महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच दारिद्र्य रेषेच्यावरील (APL) पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी आहे. यामध्ये मुलींना किमान 5000 ते 1 लाख रूपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

उडाण

सीबीएसई बोर्डाने मानव संसाधन विकास मंत्रालयासोबत 'उडाण' ही योजना सुरू केली आहे. यामध्ये मुलींचे डॉक्टर, इंजिनियर होण्याच्या स्वप्नांना आर्थिक सहाय्य दिलं जातं. एका ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून काही निवडक विद्यार्थिनींची निवड केली जाते. मुलींना विज्ञान आणि गणित विषयासाठी विशेष ट्रेनिंग दिलं जातं. मात्र ही सोय केवळ सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थींनींसाठी आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

"GirlForce: Unscripted and Unstoppable." या थीमवर यंदा जगभरात बालिका दिन साजरा केला जाणार आहे. आज 21 व्या शतकात मुलीदेखील मुलांच्या तोडीस तोड स्पर्धेच्या युगात उतरल्या आहेत. त्यांना सबळ करण्यासाठी तुम्ही काय करणार? हे आम्हांला नक्की सांगा. लेटेस्टली परिवाराकडून जगातील सार्‍या चिमुकलींना Happy International Day Of The Girl Child!