Indian Independence Day 2019: ध्वजवंदनानंतर खराब झालेले, फाटलेले झेंडे आढळल्यास काय कराल?
राष्ट्रध्वज (Photo Credits-Pixabay)

Independence Day 2019 Celebrations: भारताचा झेंडा हा आपल्या देशाची शान आहे. आज (15 ऑगस्ट) भारताच्या स्वातंत्र्यदिनी (Indian Independence Day) दिल्ली पासून गल्लीपर्यंत ध्वजारोहण केले जाते. मात्र उत्सहाच्या भरात नकळत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुमच्याकडून झेंड्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेणंदेखील आपलं कर्तव्य आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकरांनी (Milind Borikar) नागरिकांना यंदा स्वातंत्र्य दिनी प्लॅस्टिकचा झेंडा न वापरण्याचं आवाहन केलं आहे. तसेच राष्ट्रध्वजाचा मान ठेवण्यासाठी ध्वज खराब झाल्यास, फाटलेल्या अवस्थेत आढळल्यास तो तालुका किंवा जिल्हा स्तरावरील समितीकडे आणून देण्याचं आवाहन केलं आहे. Independence Day 2019: स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा फडकवण्यापूर्वी 'हे' नियम लक्षात असू द्या!

खराब झालेले राष्ट्रध्वज कुठे गोळा कराल?

खराब झालेला राष्ट्रध्वज नष्ट करण्यासाठी खास प्रक्रिया असते. त्यानुसार सन्मानपूर्वक तो नष्ट केला जातो. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी ऑफिसकडून जिल्हास्तरावर विशेष कार्यालयाची सोय आहे. यामध्ये अंधेरी, बोरिवली आणि मुलूंड भागात समिती बनवली आहे. खराब राष्ट्रध्वज तालुकास्तरावर किंवा जिल्हा समितीकडे देण्याचे अधिकार एनजीओ आणि इतर संघटनांना देण्यात आले आहेत. Flag Code of India  नुसार खराब झालेले झेंडे विशिष्ट पद्धतीमध्ये जाळून किंवा पुरून नष्ट केले जातात.

अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कागदाचा किंवा प्लॅस्टिकचा ध्वज वापरला जातो. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर तो रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळतो. चुकूनही अशाप्रकारे राष्ट्रध्वज पायाखाली येणं हा त्याचा अवमान आहे. म्हणूनच त्याचा मान ठेवण्यासाठी भारतीय ध्वजसंहिता 2002 मध्ये व अवमान प्रकरणात कारवाईबाबत राष्ट्रीय अवमान कायदा 1971 मध्ये तरतूद केलेली आहे