आज देशात सर्वत्र होलिकात्सव साजरा होईल. होलिका दहनानंतर उद्या धुळवड, रंगपंचमी सणांना सुरुवात होईल. खरंतर हे दोन्ही सण वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातात. मात्र मेट्रो सिटीमध्ये ऑफिसेस आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे सुट्टीच्या दिवशी रंगांनी होळी खेळली जाते. रंगाचा हा आनंदी सण साजरा करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण उत्साहाच्या भरात कोणतेही रंग वापरल्याने केस, त्वचा यांच्यासह आरोग्याचेही नुकसान होवू शकते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या केमिकल्सयुक्त रंगांवर फुली मारा आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नैसर्गिक रंग बनवून होळीचा आनंद घ्या. या नैसर्गिक रंगांमुळे तुम्हाला कोणताही अपाय होणार नाही. तसंच ते पर्यावरणस्नेही असल्याने रंगांमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसानही टाळता येईल. (होळीचे रंग त्वचा आणि केसांमधून काढण्यासाठी 'या' घरगुती पद्धतींचा करा वापर, जाणून घ्या Home Remedies)
या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी सहज नैसर्गिक आणि आकर्षक रंग मिळवू शकता. तर मग यंदाच्या होळीला हे रंग नक्की बनवून पहा... (धुळवड, रंगपंचमी दिवशी होळीच्या रंगांत माखण्यापूर्वी त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टी नक्की कराच!)
# गुलाबाच्या पाकळ्या उकळवून त्यात लाल रंगाच्या इन्सेंसचे तीन थेंब मिसळा. त्यानंतर थंड करुन पाण्यात मिसळा. तुम्हाला होळीसाठी लाल रंग मिळेल. हे पाणी सुगंधित करण्यासाठी तुम्ही त्यात गुलाबजल देखील टाकू शकता.
# झेंडूची फुलं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून घ्या. केशरी रंगाचे पाणी तुम्हाला मिळेल.
# रक्तचंदन पावडर देखील तुम्ही होळी खेळण्यासाठी वापरु शकता. तसंच जास्वंदाच्या फुलांपासूनही तुम्हाला लाल रंग प्राप्त करता येईल. जास्वंदाची फुलं सावलीत सुकवा आणि त्याची पावडर करून पिठात मिसळून वापरा.
# मेहंदी पावडरपासून तुम्ही हिरवा रंग मिळवू शकता. मात्र याचा वापर चेहऱ्यावर करणे टाळा. कारण चेहऱ्याचा रंग जाण्यास 3-4 दिवस लागतील.
# गुलमोहर फुलाच्या पाकळ्या सुकवून वाटून घ्या. आकर्षक केशरी रंग मिळेल.
# बीट वाटून घ्या आणि पाण्यात मिसळा. मस्त गुलाबी रंग तयार होईल. एक दिवस आधी भिजवून घेतल्यास गडद गुलाबी रंग मिळेल.
# मैदा आणि हळद त्यात थोडं पाणी घालून मिक्स केल्याने तुम्हाला पिवळा रंग मिळेल.
# मैद्यात हिरवा फूड कलर आणि पाणी घालून तुम्ही हिरवा रंग बनवू शकता. तुम्हाला फुड कलर वापरायचा नसल्यास तुम्ही पुदिना किंवा पालकाचा रस वापरु शकता.
# चहा किंवा कॉफी उकळून ती गाळून थंड करुन त्याचे पाणी तुम्ही चॉकलेटी रंग म्हणून वापरू शकता.
# काळा किंवा राखाडी रंग मिळवण्यासाठी आवळ्याचा वापर करा. आवळ्याची पुड सात–आठ तास लोखंडी भांड्यात किंवा कढईत भिजवून ठेवल्यास तुम्हाला काळा रंग मिळू शकतो. तसंच काळ्या द्राक्षांचा रस पाण्यात मिसळा व ते पाणी गाळून तुम्ही वापरु शकता.
यंदा होळीच्या सणावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे होळी सेलिब्रेशनपासून नेते मंडळीसह कलाकार मंडळी देखील अलिप्त राहणार आहेत. तर होळी खेळणाऱ्यांनी यंदा विशेष खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.