गणेश चतुर्थींच्या (Ganesh Chaturthi) आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका" (Hartalika) असे म्हणतात. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुषीसाठी तर कुमारिका चांगला वर मिळावा यासाठी हरतालिकेची पूजा करतात. तसेच ही पूजा ही भगवान शंकराची आराधना करण्यासाठी ही केला जातो. कारण देवी पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. म्हणून आपल्या कुटूंबात सुख, शांती नांदावी, तसेच आपल्या मुलांमध्ये चांगले विचार, आचारण करण्याची वृत्ती निर्माण व्हावी यासाठी भगवान शंकराकडे साकडे घातले जाते. असे म्हणतात की वर्षातील ज्यांना सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी शंकराची पूजा करता येत नाही, त्यांनी हे व्रत केल्यास त्यांना बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते.
यंदाच्या हरतालिकेसाठी महिलांनी तसेच कुमारिकांनी विशेष तयारी केली असेल. या पूजेसाठीचा शुभमुहूर्त आणि ही पूजा कशी करावी जाणून घ्या सविस्तर:
हरितालिका पूजेचा मुहूर्त:
यंदाची हरतालिका पूजेचा मुहूर्त ही 1 सप्टेंबरला सकाळी 8.27 मिनिटांनी सुरु होणार असून 2 सप्टेंबरला सकाळी 8.58 मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर चतुर्थी तिथी सुरु होईल.
कशी कराल हरतालिकेची पूजा:
या दिवशी मुली आणि सुवासिनी अंगाला तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोळी काढून आणि ेळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा.
या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.