Guru Purnima 2020 Date: यंदा 'या' दिवशी साजरी होणार गुरुपौर्णिमा; जाणून घ्या सणाचे महत्त्व आणि उद्देश
Guru Purnima 2020 | File Image

Guru Purnima 2020 Date & Significance: आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे 'गुरुपौर्णिमा.' व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. म्हणून या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. यंदा 'गुरुपौर्णिमा' रविवार 5 जुलै रोजी आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला विद्याभ्यास, संगीत, नृत्य किंवा इतर कला शिकवणाऱ्या गुरुंची पूजा करुन त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना गुरुदक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे. ज्ञानाशिवाय आयुष्यात प्रगती साधता येत नाही आणि ज्ञान गुरुंकडूनच मिळते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातील गुरुंचे स्थान अतिशय खास आणि महत्त्वाचे आहे. आई, वडील, शिक्षक या विविध रुपात गुरु व्यक्तीच्या आयुष्यात येतात. पुस्तकं देखील गुरुंचेच रुप आहेत. ज्ञान देणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू गुरु समान आहेत. मात्र गुरुंपुढे नम्र झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. तसंच संकटाच्या कठीण काळातही गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतात.

गुरुंचे आणि गुरुदक्षिणेचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक मंदिरांमध्ये उत्सवाचे वातावरण असते. तसंच नृत्य, संगीत, वादन या कला शिकणाऱ्या मंडळींसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत खास असतो. विविध कलादालनात गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी केली जाते. विधिवत पूजा, छोटेखानी कार्यक्रम, गोडाधोडाचा प्रसाद याची रेलचेल असते. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे गुरुपौर्णिमेचा उत्साह मावळला आहे.

गुरुपौर्णिमेचे महत्त्व:

व्यास हे पराशर ऋषी आणि कोळी राजाची मुलगी सत्यवती यांचे पुत्र होते. पराशर आपल्या आईच्या पोटात असताना वेदपठण करत असतं अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे ज्ञानी असलेल्या पराशर यांनी आपल्या मुलालाही शिकवून विद्वान केले. सोळा वर्षांचे असताना व्यासांना वेदांचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाले. पूर्वी ज्ञान तोंडी सांगण्याची पद्धत होती. मात्र त्यामुळे थोडा विस्कळीतपणा टाळण्यासाठी व्यासांनी वेदांची नीट रचना कली आणि आपल्या समोर आले चार वेद- ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद. या त्यांच्या कार्यामुळे त्यांना 'वेदव्यास' असेही म्हणतात. तसंच व्यासमुनी उच्चासनावर बसून वेदांचे अर्थ सांगत त्यामुळे आजही सभेत वक्ता बोलतो त्या जागेला 'व्यासपीठ' असे म्हणतात.

म्हणूनच गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंचे गुरु व्यासमुनींचे पूजन केले जाते. तसंच आयुष्यात विविध टप्प्यांवर येणाऱ्या गुरुंना वंदन करण्याचा, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.