Guru Nanak Jayanti 2018 : पंजाब राज्यासह संपूर्ण भारत आणि जगभरात कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima 2018) मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेला शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव (Guru Nanak Dev Ji) यांचा जन्मदिनही साजरा केला जातो. याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता असा उल्लेख आहे. शिख धर्म आणि शिख धर्माशी संबंधीत असलेल्या लाखो लोकांसाठी गुरुनानक जयंती (Guru Nanak Dev Ji) हा दिवस एक प्रकाश पर्व (Prakash Parv) असते. गुरुनानक यांच्याबद्दल अनेक लोककथा सांगितल्या जातात. ज्या अनेक पिढ्यांकडून पुढच्या पिढीकडे चालत आल्या आहेत. या कथा आणि कथांबाबत अनेक पुस्तकांमधूनही लिहून आले आहे. यातील दोन कथा गुरुनानकांच्या अनुयायांसाठी इथे देत आहोत.
गुरुनानक आणि आशीर्वाद कथा
एके दिवशी गुरुनानक एका गावात गेले. त्या गावातील लोक चांगल्या विचारांचे नव्हते. त्यांनी गुरुनानक यांना त्रास दिला. त्यांची अवहेलना केली. त्यांची खिल्ली उडवली. काहींनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. हे पाहून गुरु नानक त्यांच्यावर रागावले नाहीत. पण, गाव सोडताना गावकऱ्यांना ते म्हणाले तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुम्ही याच गावात आनंदाने राहा. पुढे नानकजी दुसऱ्या गावात गेले. त्या गावचे लोक चांगल्या विचारांचे होते. त्यांनी गुरुनानक यांचे आगत्याने स्वागत केले. विचारपूस केली. त्यांची सेवा केली. काही काळाने गुरुनानकजी त्यांचा निरोप घेऊन निघू लागले. तर, गावकऱ्यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. नानकजी थांबले नाहीत. पण, जाताना ते इतकेच म्हणाले की, गावकऱ्यांनो तुम्ही हा गाव सोडा. नानक यांच्या सोबत असलेल्या शिष्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी नानक साहेबांना विचारले. आगोदरच्या गावातील लोकांना तुम्ही म्हणालात आनंदाने राहा. त्या लाकांनी तर तुम्हाला त्रास दिला होता. या गावातील लोकांनी तुमची सेवा केली तर तुम्ही त्यांना म्हणता गाव सोडा. यावर नानक साहेबांनी सुंदर विचार सांगितला. ते म्हणाले, चांगल्या विचारांचे लोक जेथे जातील तो परिसर चांगला करतात. वाईट विचारांचे लोक जेथे जातील तेथील परिसरही वाईट करतात. म्हणून चांगल्या विचारांच्या लोकांचा सर्वत्र प्रचार, संचार झाला पाहिजे. वाईट विचारांचा प्रसार न होता असे लोक मर्यादेत राहायला हवेत. म्हणून आगोदरच्या गावातील लोकांना मी गाव सोडू नका म्हणालो. दुसऱ्या गावातील लोकांना मी गाव सोडण्यास सांगितले. (हेही वचाा, Kartik Purnima 2018 : कार्तिक पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळीचे महत्त्व काय ?)
गुरुनानक यांच्या लहानपणीची कथा
गुरुनानकजी वयाने अगदी लहान होते. तेव्हा, ते एका गावात गेले होते. गावातील एका घरात एक महिला रडत होती. नुकतेच जन्माला आलेले एक बाळ तिच्या कुशीत होते. नानकजींनी तिला रडण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, हे बाळ माझ्या पोटी या घरात जन्माला आले. आता ते मरणार. कोणत्या इतर महिलेच्या पोटी हे बाळ जन्माला आले असते तर, ते जगले असते. नानकजींनी विचारले असे कसे? यावर ती महिला म्हणाली होय, यापूर्वी जन्माला आलेल्या माझ्या बाळांसोबत असेच झाले आहे. मग गुरुनानक यानी ते बाळ महिलेकडून आपल्याकडे घेतले. ते तिला म्हणाले आता हे मरणार आहे ना. महिलेने मान डोलावली. ते म्हणाले हे बाळ मरणार आहे तर, हे बाळ आजपासून माझे. केविलवाण्या नजरेने ती महिला नानक यांना हो म्हणाली. मग नानक यांनी ते बाळ पुन्हा तिच्याकडे दिले आणि ते तिला म्हणाले हे बघ आजपासून हे बाळ माझे झाले आहे. याचा सांभाळ कर. पुढे हे बाळ मोठे झाले आणि गुरुनानक यांचा शिष्य आणि मित्रही बनले, अशी कथा सांगितली जाते.