Gauri Pujan 2020 Muhurat: यंदा कधी होणार गौरीचं आगमन? जाणून घ्या गौरी पूजनाचा मुहूर्त आणि पुजा विधी
Gauri Pujan 2020 | Photo Credits: File Photo

Gauri Pujan 2020 Date and Time: गणेशोत्सवात गणपती पाठोपाठ 2-3 दिवसांनी गौरीचं आगमन होतं. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं. काही ठिकाणी गौरी पूजनाला 'महालक्ष्मी पूजन' असेही म्हणतात. गौरीच्या रुपात पार्वती आपल्या बाळाला म्हणजे श्रीगणेशाला घेऊन जाण्यासाठी येते, असे मानले जाते. गौरी माहेरवाशिण असते. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन ती पुन्हा आपल्या घरी निघून जाते, अशी समजूत आहे. यंदा 25 ऑगस्ट रोजी जेष्ठगौरी आवाहन आहे. म्हणजेच या दिवशी गौरींचं आगमन होणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांची मनोभावे पूजा केली जाईल आणि तिसऱ्या दिवशी त्यांना निरोप देण्यात येईल.

गौरींचं आगमन, पूजन मुहूर्त:

25 ऑगस्टला अनुराधा नक्षत्रावर दुपारी 1.58 मिनिटांनंतर गौरींचं आगमन होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 ऑगस्टला जेष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन करण्यात येईल. त्यामुळे त्यांना जेष्ठागौरी असं म्हणतात. प्रत्येक प्रांतात गौरी पूजनाची पद्धत, कुळाचार वेगळा असतो. त्यामुळे आपआपल्या पद्धतीने गौरीपूजन साजरे केले जाते. तिसऱ्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्टला मूळ नक्षत्रावर दुपारी 12.36 मिनिटांनी गौरींचं विसर्जन केलं जाईल.

गौरी पूजा विधी:

महाराष्ट्रातील विविध प्रांतात गौरी पूजनाची वेगवेगळी पद्धत आहे. काही ठिकाणी गौरींचे नुसते मुखवटे असतात. तर काही ठिकाणी मुखवट्यांसह उभ्या गौराई पाहायला मिळतात. काही ठिकाणी खड्यांच्या गौरी पूजनाची पद्धत आहे. पाच, सात किंवा अकारा खडे आणून त्यांची पूजा केली जाते. विदर्भात गौरीला महालक्ष्मी म्हणतात. सिमेंट, लोखंडी किंवा मातीच्या कोथळ्यांवर धड बसवून त्यावर महालक्ष्मींचे मुखवटे ठेवले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी पाहायला मिळतात. म्हणजेच घरातील गहू, तांदूळ याच्या राशी मांडून त्याची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौऱ्या असतात.

पूजनासाठी गौरीला सुंदर साडी, दागदागिने घालून नटवले जाते. पूजनाच्या वेळी तिची ओटी भरली जाते. त्यानंतर साग्रसंगीताचा भोजनाचा खास नैवद्य अर्पण केला जातो. प्रत्येक प्रातांत नैवेद्य हा वेगवेगळा असतो. कोकणासह काही ठिकाणी गौरीला 'ओवसं' भरण्याची पद्धत आहे. नवविवाहितेसाठी पहिला ओवसं अगदी खास असतो.