Ganeshotsav 2020: गणेशभक्तांसाठी आनंदवार्ता; पुढच्या वर्षी बाप्पा 11 दिवस आधीच येणार
गणपती (Photo Credit : Pixabay)

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात आज गुरुवारी (12सप्टेंबर) रोजी देशभरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. अनंतचतुर्दर्शी (Anant Chaturdashi) च्या दिवशी दरवर्षीच डोळ्यात अश्रू, आणि जड अंतःकरणाने गणरायाचे भाविक बाप्पाकडे पुढील वर्षी लवकर येण्याची विनंती करत असतात, आपल्या भक्तांच्या या ईच्छेला मान देत पुढील वर्षी म्हणजेच 2020 सालात यंदाहून 11 दिवस आधीच बाप्पा आपल्या भेटीस येणार आहेत. पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार पुढील वर्षी 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीचा मुहूर्त आहे.

दाते पंचांगानुसार, महाराष्ट्रात 2020 साली, 21 ऑगस्टच्या रात्रीपासूनच गणेश चतुर्थीची सुरुवात होईल तर 1 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दर्शी असणार आहे. यामुळे साहजिकच पुढील वर्षी गणेशोत्सवाची धामधूम ही फार आधीपासूनच पाहायला मिळेल. याप्रमाणेच पुढील पाच वर्षांसाठी गणेश चतुर्थीच्या तारखांचे अंदाज सुद्धा वर्तवले जात आहेत. 2021 मध्ये 10 सप्टेंबर, 2022 मध्ये 31 ऑगस्ट , 2023 मध्ये 19 सप्टेंबर , 2024 मध्ये 7 सप्टेंबर, 2025 मध्ये 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी निमित्त बाप्पाचे आगमन होणार आहे. (Ganapati Visarjan 2019 Live Updates: मुंबई, पुणे, नागपूर शहरांसह महाराष्ट्रभरातील गणपती विसर्जन क्षणाक्षणांच्या बातम्या)

दरम्यान, आज मुंबई, पुणे , नाशिक, नागपूर सह अन्य राज्यात सुद्धा गणरायाच्या मूर्तीच्या विसर्जनाची लगबग सुरु आहे. ढोल ताशांच्या उत्साही वातावरणात वाजत गाजत बाप्पाला अलविदा केला जाईल. मुंबईत विशेषतः या सणाचा उत्साह पाहण्यासारखा असतो, लालबाग परळ परिसरातील विविध मंडळांच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक आज सकाळपासून सुरु झाली आहे.