Ganeshotsav 2019: मुलूंडमधील या गणपतीला अर्पण केले जातात फक्त वही-पेन, अमोल सलगर यांच्या कुटूंबियाचा अभिनव उपक्रम
Amol Salgar Ganesha (Photo Credits: File)

शब्दांतही ज्याचे वर्णन करता येणार नाही अशी गणेशाची मोहक रुपं.... देवांचा अधिपती असलेल्या अशा या गणरायाला विद्येची देवता म्हणूनही ओळखले जाते. अशा या आपल्या लाडक्या बाप्पासाठी गणेशोत्सवात सर्व गणेश भक्तांना काय करू आणि काय नको असे झालेले असते. आपली मनोकामना पुर्ण व्हावी किंवा पुर्ण झाली म्हणून कित्येक गणेश भक्त लाखोंच्या लाखो रुपये, दागदागिने गणेशाच्या (Ganesha) चरणी अर्पण करतात. मात्र मुलूंडमध्ये राहणारे सलगर कुटूंबाने यापैकी काहीही न करता आपल्या घरगुती गणपतीसमोर केवळ वह्या-पुस्तके अर्पण करण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. मागील 4 वर्षांपासून ते हा उपक्रम राबवित आहेत.

गणेशाला विद्येची देवता म्हणतात हे आपल्याला माहितच आहे. म्हणूनच या विद्येच्या देवतेचा त्याच्याच माध्यमातूनच विद्येचा प्रसार करणाचा विडा उचललाय मुलूंडमधील (Mulund) हरिओम नगरमध्ये राहणा-या सलगर कुटूंबाने. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात या उपक्रमाविषयी आणि त्यातून होणा-या सामाजिक कार्याविषयी.....

Amol Salgar Ganesha (Photo Credits: File Photo)
Amol Salgar Ganesha (Photo Credits: File)

मागील 4 वर्षांपासून या कुटूंबाचे प्रमुख अमोल मधुकर सलगर (Amol Madhukar Salgar) हे आपल्या घरातील गणपतीला विद्येचा प्रसार करणा-या गोष्टी अर्थात वही-पेन अर्पण करत असून आपल्या कडे येणा-या गणेश भक्तानेही याच गोष्टी आणाव्यात असा आग्रह करत आहे. ह्याविषयी अमोल सलगर यांना विचारले असता ते म्हणाले की, " गेल्या 30 ते 35 वर्षांपासून 12 दिवस आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत आहेत. यात सुरुवातीला आमच्याकडे येणारा प्रत्येक जण मिठाई, फळे, फुले गणपती चरणी अर्पण करत होता. मात्र काही वर्षांनी आम्हांला जाणवले की या गोष्टी खूप लवकर खराब होतात. त्यामुळे या गोष्टी गणपतीच्या मुखी लागत नाही तर कोणा लोकांनाही देता येत नाही. त्यामुळे लोकांनी एवढ्या श्रद्धेने आणलेल्या गोष्टी अशाच वाया जात होत्या. म्हणून आम्ही ठरवले की लोकांनी यापुढे अशा गोष्टी आणाव्या ज्याला जास्त पैसेही लागणार नाही, आणि त्यातून कोणाचे तरी भले होईल. म्हणूनच आम्ही मागील 4 वर्षांपासून आमच्या गणपतीला केवळ एक वही-पेन या गोष्टी अर्पण कराव्या असा आग्रह करत आहोत. लोकांनाही ही संकल्पना आवडल्यामुळे आमच्या या आग्रहाचा मान राखून त्यांनीही वही-पेन आणण्यास सुरुवात केली." हेही वाचा- Ganeshotsav 2019: लोअर परेलचा हा 'निसर्गाचा राजा' भिंतीवर होतो विराजमान, वाचा रुस्तम बिल्डिंगमधील या बाप्पाच्या विसर्जनाची 'इको फ्रेंडली' परंपरा

Amol Salgar Ganesha (Photo Credits: File)

अनंत चतुर्दशी नंतर आम्ही ही सर्व वह्या-पुस्तके वाशीतील 'खुशियों की पाठशाला' या शाळेतील अनाथ मुलांना देतो. ही शाळा एका सामाजिक संस्था चालवत असून येथे फूटपाथवर, ट्रॅफिक सिग्नलवरील मुले शिकण्यास येतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही खारीचा वाटा उचलावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा उपक्रम सुरु केला, असे अमोल सलगर लेटेस्टली मराठीशी बोलताना म्हणाले.

गणेश चतुर्थी हा सण प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा, श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून सामाजिकतेची जोड असेल तर आणखीनच उत्तम. आणि त्यात विद्येचा प्रसार करण्यासाठी खुद्द विद्येची देवताच माध्यम ठरत असेल तर सोन्याहून पिवळं. नाही का.....