Ganeshotsav 2019: महड गावच्या वरद विनायक मंदिराचा इतिहास व वैशिष्ठ्य जाणून घ्या
Varad Vinayak Mahad (Photo Credits: Youtube)

अष्टविनायक (Ashtavinayka)  गणेशाची यात्रा ही गणरायाच्या भक्तांसाठी विशेष मानली जाते, त्यातही गणेशोत्सवाचा सोहळा म्हणजे यात्रेसाठी दुग्धशर्करा योग. पण जर का काही कारणास्तव तुम्हाला ही यात्रा करणे शक्य नसेल तरी काळजीचे कारण नाही. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत अष्टविनायक सफर तुमच्या बोटाच्या क्लिकवर.. याच निमित्ताने चला तर मग आज अष्टविनायकातील चौथा मानाचा गणपती, म्हणजेच महड गावाचा वरद विनायका (Varad Vinayak) विषयी जाणून घेऊयात. मुंबईपासून अष्टविनायकाची यात्रा सुरु केल्यास कोकणातील रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड (Mahad) येथे स्थित वरद विनायक गणपती मंदिर चौथ्या स्थानी येते. या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे भाविकांना अतिशय जवळ जाऊन बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन करता येते.

वरद विनायक मंदिर

वरद विनायक मंदिराचा गाभारा हेमांडपंथी असून याचे बांधकाम पेशव्यांच्या कारकिर्दीतील आहे. मंदिरातील गणेशाची मूर्ती ही पूर्वाभिमुख असून बाप्पा आशीर्वाद रूपात भाविकांना सुख व समृद्धी देतो असे मानले जाते, यावरूनच येथील गणेशाला वरदविनायकहे नाव देण्यात आले आहे.मंदिराच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. 8' 8 फूट असलेल्या या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. मूर्तीच्या शेजारी एक नंदादीप १८९२ पासून तेवत आहे.

कसे पोहचाल?

पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली जवळ हा गणपती आहे. पुण्यापासून अंदाजे 80 किलो‍मीटरवर हे देऊळ आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड 24 कि.मी. आहे. याशिवाय कर्जत ते महड फाटा एस.टी. बसेस सुद्धा उपलब्ध आहेत, जिथून आपण पायी चालत सुद्धा मंदिरात पोहचू शकतो.

इतिहास व आख्यायिका

असं म्हणतात की वरद विनायकाची मूर्ती ही स्वयंभू आहे. धोंडू पौढकर नामक गृहस्थांना 1690 साली ही मूर्ती एका तलावात सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी याठिकाणी देऊळ बांधले व महाड गाव निर्माण केले. या मंदिराशी संबंधित आख्यायिका ही नावाचे ऋषी होते. एकदा त्याच्या आश्रमाला राजा रूक्मांगदाने भेट दिली. त्यावेळी ऋषीपत्नी त्याच्या रूपावर मोहित झाली. तिने त्याला आपल्या आश्रमात बोलावले मात्र त्याने तिकडे जायला नकार दिला. हे देवांचा राजा इंद्राला कळाले तेव्हा त्याने रूक्मांगदाचे रूप घेऊन तिचा उपभोग घेतला. यानंतर त्यांना गृटसामंड नावाचा मुलगा झाला. त्याला मोठेपणी आपल्या जन्माची कथा समजल्यानंतर आईला शाप देऊन बोराचे झाड बनविले. तिनेही त्याला तुझा मुलगा राक्षस होईल असा शाप दिला. शापित गृटसामंड नंतर पुष्पक जंगलात गेला व गणेशाची पूजा करू लागला. त्याला तेथे देऊळ सापडले. हे मंदिर म्हणजे वरदविनायकाचे निवासस्थान.

असं म्हणतात की, वरदविनायक हा भक्ताच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा व मनोकामना पुर्ण करणारा देव आहे. माघ व भाद्रपद महिन्यात सुरुवातीचे पाच दिवस मोठा सोहळा पार पडतो. वरद विनायक गणपतीचे दर्शनाने अष्टविनायक यात्रा 50 टक्के पूर्ण झाली असे मानले जाते. यापुढे चिंतामणी, गिरिजात्मज, विघनहार व महागणपती यां मंदिरांची यात्रा सुरु राहते.