श्रीमंत दगडूशेठ गणपती ( Photo Credit : dagadusheth Ganpati.com and ANI )

पुणे :   बुधवार पेठेत वसलेला आणि पुण्याची ओळख असलेला श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं यंदाचं १२६ वे वर्ष आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतीप्रमाणेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीलाही गर्दी असते. आकर्षक सजावट, हटके गणेशमूर्ती पाहण्यासाठी देशा-परदेशातून भाविक येतात. शतकोत्तर रौप्य महोत्सव (१२५ वर्ष) मागील वर्षी पार पडल्यानंतर यंदाही गणेशभक्तांनी या गणपतीला गर्दी केली आहे.

१२६ किलोचा मोदक

गणपतीच्या नैवेद्यातील आवडीचा प्रसाद म्हणजे मोदक. श्रीमंत दगडूशेठ गणपतीला यंदा १२६ वर्ष पूर्ण होत असल्याने एका भक्ताने गणेशोत्सवाच्या बाप्पासाठी १२६ किलोचा माव्याचा मोदक अर्पण केला आहे. हा मोदक सुकामेवा तसेच सोन्या -चांदीच्या वर्खाने सजला आहे. हा भाविक बारशी, सोलापूरचा आहे. पुण्यातील काका हलवाई मिठाईगृहात हा मोदक बनवला आहे.

पुण्यातील लोकप्रिय गणपती

श्रीमंत दगडूशेठ गणपती हा पुण्याची ओळख आहे. १८९३ साली लोकमान्य टिळकांनी या मंदिराच्या स्थापनेला मदत केली होती. तसेच या गणपतीची प्राणप्रतिष्ठादेखील लोकमान्य टिळकांनी केली आहे. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सव, गुढी पाडवा हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अक्षय्य तृतीयेला आंबा महोत्सव आणि वसंत पंचमीला हे मंदिर मोगरा उत्सवात रंगतं. या काळात सारं मंदिर मोगरा आणि विविध प्रकारच्या फुलांनी सजलेलं दिसते.