Gajanan Maharaj Prakat Din 2020: काय आहे श्री गजाजन महाराज यांच्या प्रगट दिनामागची कथा; जाणून घ्या सविस्तर
Gajanan Maharaj Prakat Din 2020 (Photo Credits: Facebook)

Gajanan Maharaj Prakat Din Importance: शेगावच्या श्री गजानन महाराजांना दत्तगुरु आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते. त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे अवतारही मानले जातात. गजाजन महाराजांच्या जन्माविषयी तशी कोणालाच खरी माहिती नाही. त्यांचा जन्म कधी झाला असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे समाधानकारक उत्तर मिळणार आहे. कारण त्यांचा जन्म हा न उलगडलेलं कोडं आहे. पण असं म्हणतात की इंग्रजी दिनदर्शिके प्रमाणे 23 फेब्रुवारी 1878 मध्ये ज्याला शेगावात (Shegaon) पहिल्यांदा पाहिले गेले होते. हिंदू पंचांगानुसार, या माघ महिन्यातील कृष्ण पक्ष सप्तमी होती. त्यामुळे तिथी प्रमाणे आज त्यांचा प्रगट दिन आहे.

त्यामुळे आज तिथी नुसार आलेल्या प्रगट दिनाला आज शेगावात मोठा प्रगटोत्सव दिन साजरा केला जातो. या दिवशी श्री गजानन महाराजांची पालखी मिरवणूक काढली जाते आणि त्यांच्या पादुकांच्या पूजन केले जाते. असे म्हणतात की ज्या दिवशी ते दिसले तेव्हा ते 18 वर्षांचे होते. त्या वेळी ते शेगावातील देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते.

महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती.

महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्‍यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.

शेगावचे संत गजानन महाराज हे नेहमी मधून-मधून ‘गण गणगणात बोते’असा मंत्र म्हणत असत. एका शिष्याने महाराजांना त्याचा अर्थ विचारला. गजानन महाराज म्हणाले,‘पहिला ‘गण’ म्हणजे जीव किंवा जीवात्मा, दुसरा ‘गण’ शब्द म्हणजे शिव किंवा शिवात्मा आणि तिसरा शब्द ‘गणात’ म्हणजे ‘हृदयात’.‘बोते’ म्हणजे पहा, बघा. ‘गण गण गणात बोते’, याचा अर्थ ‘हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला,परमेश्वराला बघ असा होतो.

महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये. गजानन महाराजांची शिकवण आजही अनेक लोक आत्मसात करतात.