धनत्रयोदशी सोने दर (संग्रहित, संपादित प्रतिमा)

यंदाची दिवळी विविध क्षेत्रांसाठी काहीशी मंदीच्या छायेत झाकोळलेली दिसते आहे. पण, सराफा बाजारावर मात्र या मंदीचा विशेष प्रभाव दिसला नाही. धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड सराफा बाजारात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे तर, केवळ धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तब्बल ४०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचेही पाहायला मिळाले. धनत्रयोदशी दिवशी सोने दर प्रति दहा ग्रॅम (प्रति तोळा) ३२ हजार ८०० रुपयांवर पोहोचले. तरीसुद्धा ग्राहकांनी मुंबईतील झवेरी बाजार आणि इतर ठिकाणच्या सोने पेढीवर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

शेअर बाजारात अलिकडील काही दिवसांत पाहायला मिळणारे तीव्र चढउतार, डॉलरच्या तुलनेत होणारे रुपयांचे अवमुल्यन त्यातच आलेली लग्नसराई आदींचा परिणाम म्हणून ग्राहकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिल्याचे अभ्यास सांगतात. अभ्यासक सांगात की, गेल्या ८ वर्षांमध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना थोडाथोडका नव्हे तर, तब्बल ७० टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे. त्या तुलनेत शेअर बाजाराचा विचार करु पाहता तो परतावा केवळ १४ टक्के इतकाच आहे. त्यामुळेच ग्राहक सोने खरेदीस अधिक प्राधान्य देत असल्याचे निरिक्षण अभ्यासक नोंदवतात. (हेही वाचा, Diwali 2018 : धनतेरस दिवशी मुंबई,पुणे ठिकाणी सोनं, चांदीचा नेमका दर काय ?)

दरम्यान, अलिकडील काळात ग्राहकांची अभिरुचीही बदलत असून, त्यानुसा खरेदीचा ट्रेण्डही बदलताना दिसतो आहे. पारंपरीक खरेदीपेक्षा ग्राहकांनी डायमंड ज्वेलरीला अधिक प्राधान्य दिल्याचे पेढी चालकांनी दिलेल्या माहितीवरुन पुढे येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डायमंड ज्वेलरीमध्ये २५ टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.