
Deep Pujan 2020: दीप म्हणजेच दिव्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मीय आषाढी आमावस्येला (Ashadha Amavasya) दीप अमावस्या (Deep Amavasya) साजरी करतात. सोमवती अमावस्या (Somvati Amavasya) म्हणून देखील ती ओळखली जाते. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, 20 जुलै 2020, सोमवार दिवशी, दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या साजरी केली जाणार आहे. या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतिक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मग यंदा तुम्ही दीप अमावस्या साजरी करणार असाल तर जाणून घ्या दीप अमावस्या दिवशी आलेले दीप पूजनाचं महत्त्व, पूजा विधी. Shravan Month 2020 in Maharashtra:महाराष्ट्रात श्रावण महिना 21 जुलै पासून; श्रावणी सोमवार, मंगळागौर ते महत्त्वाच्या सणांच्या पहा तारखा.
दीप अमावस्या वेळ तारीख
आषाढी अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. यंदा आषाढी अमावस्येला सुरूवात 19 जुलै दिवशी उत्तर रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सुरू होणार आहे तर 20 जुलै दिवशी रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी संपणार आहे.
दीप अमावस्या का साजरी केली जाते?
भारतीय सण संस्कृती यांचा निर्सगाच्या चक्राशी आणि परिणामी त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याचा एकमेकाशी नेहमीच काही संबंध असतो. आषाढ- श्रावण हे महिने पावसाळ्यात येतात. आषाढातला काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणार्या महिन्याची सुरूवात होते. पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीपअमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते.
कशी साजरी कराल दीप अमावस्या?
दीप अमावस्येला दीप पूजन केले जाते. त्यामुळे घरातील पितळेचे, चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड पसरून दिव्यांची मांडणी करतात. ते तीळ्याच्या तेलात किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित केले जातात. या दिव्यांची फुलं, नैवेद्या दाखवून पूजा केली जाते. दरम्यान अनेक ठिकाणी कणकेचे किंवा मातीचे दिवे लावून देखील दीप अमावस्या साजरी केली जाते. अनेक घरात या दिवशी पुरणाचे दिंड बनवून तो गोडाचा नैवेद्य बनवला जातो.
सण- संस्कृती आपल्या देशात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. भारतामध्ये श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा आणि सण समारंभांची रेलचेल असल्याने 'राजा' म्हणून ओळखला जातो. यंदा अजूनही कोरोना व्हायरसचं संकट आपल्यावर घोंघावत असल्याने मंदिरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात सण साजरा करता येणार नाही. मंगळागौरीच्या निमित्ताने रात्र जागवण्याचे भव्य कार्यक्रम होणार नाहीत. परंतू घराघरात दिवा लावून तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी, प्रियजण, नातलगांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना नक्की केली जाऊ शकते.