Shravan 2020 In Maharashtra| File Photo

Shravan Month 2020 Date:  श्रावण (Shravan) हा हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याला (Shravan Maas) सुरूवात त्यामुळे यंदा त्याची सुरूवात 21 जुलै पासून होणार आहे. दरम्यान श्रावण महिन्यात सणांची, व्रत वैकल्यांची रेलचेल असल्याने या महिन्यात घराघरात मांगल्याचं, समाधानाचं, प्रसन्न वातावरण असतं. यंदा श्रावण महिन्याची सुरूवात, मंगळवार 21 जुलै दिवशी होणार असल्याने मंगळागौर साजरी करत यंदा या व्रतांची सुरूवात होईल. 21 जुलै ते 18 ऑगस्ट पर्यंत श्रावण महिना असेल. दरम्यान उत्तर भारतामध्ये आज (6 जुलै) पासूनच श्रावण म्हणजेच सावन महिन्याला सुरूवात झाली आहे. उत्तर भारतात श्रावणी सोमवार पासून व्रतांची मालिका सुरू झाली आहे.

श्रावण महिन्यात पावसाळी वातावरणामध्ये शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी वर्त, उपवास करण्याचा सल्ला आरोग्याच्या दृष्टीने हितकारी समजला जातो. श्रावण महिन्यात सोमवारी श्रावणी सोमवार, मंगळवारी मंगळागौर, शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्याचा नियम आहे. यासोबतच येणारे सण उत्साहात साजरे केले जातात.

श्रावण महिना प्रारंभ तिथी, तारीख, वेळ

आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो. यंदा आषाढ अमावस्या 20 जुलै दिवशी रात्री 11 वाजून 02 मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे.

श्रावण माहिन्यात यंदा 21, 28 जुलै, 4, 11, 18 ऑगस्ट दिवशी मंगळागौर पूजन केले जाणार आहे. 27 जुलै, 3, 10, 17 ऑगस्ट दिवशी श्रावणी सोमवार साजरा केला जाईल. शंकर महादेवाच्या भक्तांसाठी श्रावणी सोमवारचं विशेष महत्त्व असतं.

दरम्यान 19 ऑगस्ट दिवशी रात्री 8 वाजून 11 मिनिटांनी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे.

श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीपासून सणांची धामधूम सुरू होते. यासोबत नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, दहीहंडी, बैल पोळा हे सण विशेष उत्साहाने साजरे केले जातात. अनेक घरांमध्ये चांगला मुहूर्त पाहून सत्यानारायण पूजेचे देखील आयोजन करण्याची प्रथा आहे. हा महिनाभर मांसाहार, कांदा-लसूण युक्त जेवण, पदार्थ टाळले जातात.