Datta Jayanti | File Image

ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा अवतार म्हणजे दत्तात्रय अर्थात दत्तांचा जन्म दिवस हा दत्त जयंती (Datta Jayanti) म्हणून साजरा केला जातो. यंदा ही दत्त जयंती 14 डिसेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही दत्त जयंती असते. मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमा (Margashirsha Purnima) ही दत्त पौर्णिमा, दत्त जयंती म्हणून ओळखला जातो.

हिंदू धर्मीयांसाठी मार्गशीर्ष महिना हा खास असतो. या पवित्र महिन्यात गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला दत्त जयंती असते त्यामुळे राज्यभरातील दत्तात्रयांची स्थानं असलेल्या ठिकाणी भाविकांची गर्दी असते.

दत्त जयंती

महाराष्ट्रात दत्त जयंती चा उत्सव 14 डिसेंबरला संध्याकाळी 5 पासून सुरू होऊन 15 डिसेंबरला दुपारी 2. 32 ला संपणार आहे. दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील पहिले गुरू मानले जातात. हिंदू धर्माचा प्रसारासाठी दत्तात्रेयांनी भारतभम्रण केले. अत्री ऋषी व माता अनसूया यांच्या पोटी दत्तात्रयांचा जन्म झाला होता. आता दत्त जयंतीच्या निमित्ताने

महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन ही दत्ताची ठिकाणं आहेत. . महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये दत्त यांचा जन्म झाल्याची अख्यायिका आहे, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

दत्त जयंती कशी साजरी केली जाते? 

दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दत्त मंदिरातमध्ये जाऊन दर्शन घेण्याची प्रथा आहे. तसेच दत्त जयंती दिवशी अनेक भाविक गुरुचरित्र हा दत्त गुरूंच्या कार्यावर बेतलेल्या खास ग्रंथाचं वाचन करतात. मंत्रोच्चारदेखील केले जातात. श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार तर 'स्वामी समर्थ  हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजा करतात.