Dattatreya Jayanti 2018 : मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस महाराष्ट्रामध्ये दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा दत्त जयंतीचा उत्सव 22 डिसेंबर 2018, शनिवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने माहुर, औंदुबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कुरवपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दत्तामध्ये गुरू आणि ईश्वर अशी दोन्ही रूपं असतात. Datta Jayanti 2018 : गाणगापूर, नरसोबाची वाडी, माहूरगड या प्रसिद्ध दत्तक्षेत्र ठिकाणी कशी भेट द्याल ?
दत्त जयंती महत्त्व
दत्तात्रय हा शब्द 'दत्त' आणि 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म, मुक्त, आत्मा आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. तर 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. दत्ताच्या जन्माविषयी अनेक कथा आहेत. मात्र साऱ्याच कथांमधून दत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र आणि विष्णूचा अवतार असा होतो.
दत्त हे ब्रह्मा, विष्णु, महेश या तीन देवतांचं एकत्र रूप आहे. दत्त ही देवता हिंदू धर्मातील पहिले गुरू असल्याचा समज आहे. हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारतभम्रण केल्याचा उल्लेख आहे. जिथे जिथे दत्त गुरू फिरले तेथे त्यांनी आपली स्थान निर्माण केली. या स्थानांच्या माध्यमातून पुढे त्यांच्या अनुयायांनी वसा चालू ठेवला. महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये दत्त यांचा जन्म झाल्याची अख्यायिका आहे, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
दत्त जयंती पूजा मुहूर्त
दाते पंचांगानुसार, दत्त जयंती 21 डिसेंबरच्या रात्री 2 वाजून 09 मिनिटांनी सुरू होईल तर दत्त जयंतीचा उत्सव 22 डिसेंबरच्या दिवशी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी संपणार आहे. मृग नक्षत्र रात्री 11:15 वाजता संपणार आहे.
दत्त जयंती कशी साजरी केली जाते?
दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दत्त मंदिरातमध्ये जाऊन दर्शन घेण्याची प्रथा आहे. तसेच दत्त जयंती दिवशी अनेक भाविक गुरुचरित्र हा दत्त गुरूंच्या कार्यावर बेतलेल्या खास ग्रंथाचं वाचन करतात. मंत्रोच्चारदेखील केले जातात. श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार तर 'स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजा करतात.