दिवाळीच्या पाच दिवसांमधील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज (Bhaubeej 2022). बहिण-भावाच्या अतूट नात्याचा व प्रेमाचा हा दिवस. कार्तिक शुद्ध द्वितीयेस देशभरात भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. या दिवशी यमुनेमध्ये स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्यावर्षी यमापासून भय नसते असा समज आहे. यावर्षी बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी होईल.
बंधू भगिनींचा प्रेमसंवर्धनचा हा दिवस आहे. द्वितीयेचा चंद्र जसा वर्धमानता दाखवणारा आहे, तसेच बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो ही या सणामागची भूमिका आहे. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्रकोरीस नंतर भावाला ओवाळते. त्यानंतर भाऊ ओवाळणी म्हणून काही भेटवस्तू बहिणीला देतो.
तर अशा या खास दिवशी मराठी Messages, Greetings, Quotes, HD Images, Wishes, Wallpapers शेअर करून तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: आनंदाने साजरा करा बहिण-भावाच्या प्रेमाच्या नात्याचा सण, भाऊबीजेला बहिणीला द्या काही हटके गिफ्ट)
दरम्यान, या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे असा प्रघात आहे.
या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. या दिवशी होणारी भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो.