Balasaheb Thackeray (Photo Credits: shivsena.in)

बाळ केशव ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर हळूहळू बदलत्या राजकीय प्रवाहासोबत बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुहृद्यसम्राट झाले. आपल्या ठाम आणि बेधडक स्वभावामुळे, राजकीय भूमिकांमुळे ते जनसामान्यांसोबतच अनेक स्थानिक आणि देश पातळीवरील राजकीय पक्षांसोबत, नेत्यांसोबत जोडले गेले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या बाळ ठाकरे यांचा देशभर पसरलेला दबदबा आजही अनेकांना थक्क करणारा आहे. त्यामुळे आज त्यांच्या जन्मदिनी जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही खास आणि विरळाने लोकांना ठाऊक असलेल्या काही खास गोष्टी!

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल खास गोष्टी

  • बाळ ठाकरे आपले शालेय शिक्षण पूर्ण करू शकले नव्हते. प्रबोधनकार ठाकरेंचा फिरतीचा व्यवसाय आणि आर्थिक तंगी यामुळे बाळ ठाकरे यांचे शिक्षण पुर्ण झाले नाही. पण अशा परिस्थितीतही त्यांना मराठी सह इंग्रजी भाषेचीही उत्तम जाण होती.
  • ठाकरे यांच्या नावाच्या स्पेलिंग बाबातही एक किस्सा आहे. असं म्हणतात की ठाकरे यांच्या आडनावाची स्पेलिंग “Thakre” नसून Thackeray करण्यामागे त्यांना ब्रिटीश लेखक William Makepeace Thackeray आवडत असल्याने त्यांनी त्यांच्या आडनावाची स्पेलिंग "Thackeray" केली.
  • वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या सांगण्यावरून बाळ ठाकरेंनी सुरूवातीला केवळ व्यंगचित्रांच्या माध्यमातून मराठी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मांडलेली भूमिका राजकारणाच्या थेट प्रवाहात येऊन मांडण्यासाठी 'शिवसेना' पक्षाची सुरूवात केली. दादर येथील कदम मॅन्शन मधील राहत्या घरी पक्षाच्या स्थापनेचा नारळ वाढवण्यात आला होता. नक्की वाचा: Bal Thackeray Birth Anniversary: ..जेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, 'संज्या, फिकर मत कर', 'कमळीची चिंता करु नका' .
  • बाळासाहेब ठाकरे राजकारणात जितके रमले तेवढीच त्यांना 'गार्डनिंग' ची आवड होती. घरात बागकाम हा त्यांचा उत्तम विरंगुळा होता. कलानगर, कर्जतच्या घरि देखील त्यांनी अनेक झाडं लावली होती.
  • बाळासाहेब कितीही कणखर, बेधडक व्यक्तिमत्त्वाचे असले तरीही ते इंजेक्शन घेण्यापासून दूर पळत राहिले. त्यांचा अ‍ॅलोपॅथी वैद्यकीय उपचारांपेक्षा होमिओपॅथीवर, नैसर्गिक उपचारांकडे अनेक वर्ष कल होता.

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यामध्ये 23 जानेवारी 1926 दिवशी झाला तर मृत्यू वृद्धापकाळामुळे मुंबई मध्ये मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी 17 नोव्हेंबर 2012 दिवशी झाला. बाळासाहेबांच्या मृत्यूपश्चात शिवसेना पक्षाची धुरा उद्धव  ठाकरे सांभाळत आहेत.