Annabhau Sathe Birth Anniversary: अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) या महाराष्ट्रातील लोककलावंताच्या जन्म शताब्दी वर्षाला आजपासून सुरूवात होते. साहित्यिक, समाजसुधारक, लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहानशा गावात झाला. अशिक्षित असूनही त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्याचा समाजव्यवस्थेवर झालेला परिणाम गौरवास्पद आहे. त्यांच्या योगदानाबद्दल या काही खास गोष्टी! अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार जे आजच्या समाज व्यवस्थेवरही करतात प्रहार
कोण होते अण्णाभाऊ साठे?
# तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचे मूळ नाव होते. परंतू त्यांची ओळख अण्णाभाऊ साठे अशीच आहे.
# शालेय शिक्षणाचे शाळेत जाऊन धडे गिरवले नसले तरीही त्यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. 21 कथासंग्रह आणि 30पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. फकिरा ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे.
# आपल्या साहित्यातून उपेक्षितांचे दर्शन घडविताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संघर्षाची विद्रोही ठिणगी पेटवली आणि समता जपणारे समाजाचे स्वप्न दाखवले.
# देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी देखील अण्णाभाऊ साठे यांनी "यह आझादी झुटी है,देश की जनता भुकी है", असं म्हणत जनतेचा असंतोष व्यक्त केला होता.
# गोवा स्वातंत्र्यसंग्राम आणि महाराष्ट्र संयुक्त चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे कार्य विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या शाहिरीने त्यांनी समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलं. त्यापैकी ' माझी मैना गावाकडे राहिली...' ही लावणी विशेष गाजली.
# अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून पोहचवले. शिवरायांच्या चरित्राचे पुढे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले. रशियन राष्ट्रध्यक्षांकडून त्यांचा सन्मान झाला होता.
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा त्यांच्या कार्याला सन्मान करण्यासाठी विशेष टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आलं आहे.