आज फाल्गुन कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आणि मंगळवारचा दिवस आहे. चतुर्थी तिथी रात्री तीनपर्यंत असणार आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचे संकष्टीचे व्रत (Sankashti Chaturthi) केले जाते. जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तो दिवस अंगारकी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi 2021) म्हणून साजरा होतो. या दिवशी राज्यातील तसेच देशभरातील गणपतीच्या मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चना केली जाते. आता आज 2 मार्च दिवशी अंगारकी चतुर्थी आहे. मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर (Shri Siddhivinayak Temple) हे गणेशभक्तांचे आराध्य दैवत. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भक्तांना मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची मुभा नव्हती. अशा परिस्थितीमध्ये मंदिर ट्रस्टकडून ऑनलाईन दर्शन व धूपआरतीची (Dhoop Aarti) सोय करण्यात आली होती.
‘श्री सिद्धिविनायक मंदिर’च्या सोशल खात्यांवर धूपआरतीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आज अंगारकीच्या निमित्ताने ज्या भाविकांना मंदिरामध्ये गणपतीचे दर्शन घेता आले नाही, त्यांच्यासाठी ही धूपआरती खास पर्वणी ठरणार आहे. यासह आज सिद्धिविनायक मंदिरामध्ये आधी नोंदणी केलेल्या भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे.
Angarak Ganesh Sankashta Chaturthi
Dhoop Aarti
2/3/2021 pic.twitter.com/Re7YJLY1wm
— Shri Siddhivinayak Temple (@SVTMumbai) March 2, 2021
अंगारकी चतुर्थी कथा –
मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव ‘अंगारक’ हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते, असा समज आहे.
दरम्यान, यावर्षी यंदा तीन अंगारकी चतुर्थी आहे. ज्यातील पहिली अंगारकी 2 मार्चला, त्यानंतर 27 जुलै आणि 23 नोव्हेंबरला असणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते. दिवसभराचा उपवास करून गणपतीची आराधना करून संकट दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते.