Anganewadi Bharadi Devi Jatra 2020: यंदा आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेला तुम्ही मालवण मध्ये कसे पोहचाल?
Bharadi Devi Jatra 2020 | Photo Credits: Instagram

Anganewadi Jatra 2020 Date: कोकणवासियांसाठी श्रद्धास्थान असलेल्या मालवणातील (Malvan) भराडी देवीची जत्रा (Bharadi Devi Jatra)  यंदा 17 फेब्रुवारी 2020 दिवशी आहे. नवसाला पावणारी देवी अशी आंगणेवाडीतील या देवीची ख्याती देशा-परदेशात पसरली आहे. त्यामुळे दरवर्षी भरणार्‍या या देवीच्या दीड दिवसांच्या यात्रेला मुंबई, पुणे शहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमणी कोकणात दाखल होतात. मग यंदा तुम्ही देखील आंगणेवाडीच्या यात्रेसाठी मालवणात जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर पहा रस्ते मार्ग, रेल्वे, बस यांच्या माध्यमातून आंगणेवाडीच्या जत्रेला कसे पोहचाल? Anganewadi Jatra 2020 Special Trains: यंदा 17 फेब्रुवारीला आंगणेवाडी जत्रेला पोहचण्यासाठी मध्य रेल्वे चालवणार 4 विशेष गाड्या; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक.

आंगणेवाडीची जत्रा ही मालवणातील केवळ आंगणे या गावातील असते. मात्र त्याची ख्याती सर्वदूर पसरली असल्याने आता मोठ्या प्रमाणात भाविक येतात. दरम्यान आता सिंधुदुर्गातील मालवणच्या समुद्र किनार्‍यावर पर्यटकांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने तुम्ही देवीच्या जत्रेसोबत तळकोकणात एक शॉर्ट ट्रीप प्लॅन करू शकता. Anganewadi Jatra 2020 Date: आंंगणेवाडीतील भराडी देवी जत्रा तारीख जाहीर; यंदा 17 फेब्रुवारी दिवशी रंगणार उत्सव.

 आंगणेवाडी जत्रा 2020 साठी कसे पोहचाल?

  • ट्रेनने कसे जाल?

कोकण रेल्वे हा मालवणात पोहचण्याचा एक आरामदायी पर्याय आहे. आंगणेवाडीला पोहचण्यासाठी तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर रत्नागिरी किंवा कणकवली या दोन स्थानकांपैकी एका स्थानकावर उतरावे लागेल.

रत्नागिरी स्टेशनवरुन एसीटी बस किंवा रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. रत्नागिरी एसटी डेपोमध्ये पोहचल्यानंतर आंगणेवाडीला जाण्यासाठी तिथून दर अर्ध्या तासाने एसटी बसेस उपलब्ध आहेत. या बसेस जत्रेच्या दोन्ही दिवशी पहाटेपासून सुरु होतात आणि त्याचप्रमाणे आंगणेवाडीहून रत्नागिरीला परतण्यासाठी दर एका तासाने बसेस उपलब्ध आहेत.कणकवली स्टेशनपासून कणकवली डेपोपर्यंत जाण्यासाठी शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. कणकवली बस डेपोतून आंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने बसेस आहेत.

  • बसने कसे जाल?

खाजगी बसने प्रवास करणार असाल रत्नागिरी किंवा कणकवलीपर्यंत जाऊ शकता. या बसेस तुम्हाला रत्नागिरी किंवा कणकवलीपर्यंत जाण्याची सोय आहे. तिथून पुढे तुम्ही एसटी महामंडळाच्या बसेसने आंगणेवाडीपर्यंत पोहचू शकता.

  • प्रायव्हेट गाडी

तुम्हांला कोकणाच्या सौंदर्याचा आनंद लूटत जायचं असेल तर प्रायव्हेट कारने देखील जाऊ शकतात. पुणे-कोल्हापूर महामार्गे आणि मुंबई - गोवा महामार्ग वरून तुम्ही आंगणेवाडीला पोहचू शकता.

अद्याप कोकणात नियामित विमानसेवा सुरू झालेली नाही. पण तुम्हांला कोकणात जाण्यासाठी गोव्याला जाऊन आंगणेवाडीसाठी प्रवास करू शकता.

कोकण रेल्वेचं बुकिंग चार महिने आधीच हाऊसफुल्ल होतं. त्यामुळे केवळ रेल्वेच्या बुकिंगवर अवालंबून राहू नका. रेल्वे प्रशासनाकडून भाविकांसाठी या काळात खास गाड्या सोडल्या जातात. तसेच एसटी महामंडळाकडूनही खास बस सोडल्या जातात.