Anant Chaturdashi 2019: अनंत चतुर्दशी दिवशी का केले जाते गणपती बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या त्यामागची दंतकथा
Ganesh Visarjan (Photo Credits: Instagram)

Ganeshotsav 2019: अनंत चतुर्दशीचा दिवस जसजसा जवळ येऊ लागतो, तसतशी गणेश भक्तांच्या मनातील चलबिचल वाढू लागते. कारण गेले 10 दिवस ज्या बाप्पाची आपण मनोभावे पूजा केली, कोडकौतुक केले त्याचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलेली असते. हा विचार, तो क्षण गणेश भक्तांना खूप भावूक करणारा असतो. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) साजरी केली जाते. दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. यात घरगुती गणपतींसोबत मंडळांचे मोठाले गणपतींचे विसर्जन याच दिवशी होते.

तमाम गणेश भक्तांना भावूक करणारा असा हा अनंत चतुर्दशीचा दिवस असला तरीही बाप्पाने पुढच्या वर्षी लवकर यावे यासाठी तितकाच जल्लोषात, आनंदात साजरा केला जातो. या दिवशी 10 दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते हे आपल्या सर्वांना माहितच आहे, मात्र याच दिवशी हे विसर्जन का केले जाते हे आपल्या पैकी ब-याच जणांना प्रश्न पडला असेल. जाणून घेऊया यामागची पुराणात सांगितलेली दंतकथा

धार्मिक ग्रंथानुसार, असं सांगण्यात येत की, महर्षी वेदव्यासांनी गणेश चतुर्थीपासून सलग दहा दिवसांपर्यंत महाभारताची कथा गणपतीला ऐकवली होती. ही कथा गणपती अक्षरशः 10 दिवस लिहित होता. लिहिली होती. जेव्हा वेदव्‍यास कथा सांगत होते तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद ठेवले होते. त्यामुळे आपल्याला हे माहित नव्हते की, या कथेचा गणपतीवर काय प्रभाव पडत आहे.

हेही वाचा- Ganesh Visarjan 2019 Muhurat: यंदा दीड, 5,7 आणि 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्याचे मुहूर्त काय?

कथा पूर्ण झाल्यावर जेव्हा महर्षीने डोळे उघडले तेव्हा त्यांनी बघितले की 10 दिवसांपासून कथा ऐकल्याने गणपतीचे शरीराचे तापमान फार वाढले होते. त्यांना ताप आला होता. त्यावेळी महर्षी वेदव्‍यासांनी गणपतीला जवळच्या कुंडांत डुबकी लावायला सांगितली ज्याने त्यांच्या शरीरातील ताप थोडा कमी झाला. त्यामुळे असे मानले जाते की गण‍पती गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत सगुण साकार रूपात या मूर्तीत स्थापित राहतात. त्यामुळे हे 10 दिवस भक्तांच्या इच्छा ऐकून गणपतीची ही मूर्ती गरम झालेली असते. त्यामुळे चतुर्दशीला या मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करून तिला थंड करून गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.

अनंत चतुर्दशी दिवशी विशेषत: मंडळाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे या दिवशी रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यंदाही अशाच जल्लोषात आणि उत्साहात गणपती बाप्पाचे विसर्जन करून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात गणरायाचा निरोप घेतला जाईल.