Akshaya Tritiya 2022 Date: अक्षय्य तृतीया यंदा 3 मे दिवशी; जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व
Akshay Tritiya 2021 HD Images (PC - File Iamge)

वैशाख शुक्ल तृतीया हा दिवस हिंदू धर्मीय अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) म्हणून साजरी करतात. हिंदू पुराणातील मान्यातांनुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात ज्या तृतीयेला चंद्र रोहिणी नक्षत्रात येतो त्या तृतीयेला 'अक्षय्य तृतीया' हा मंगलमय दिवस साजरा केला जातो. अक्षय्य तृत्तीयेच्या निमित्ताने केलेला जप, होम, दान आदि गोष्टी अक्षय फल देणाऱ्या होतात म्हणून या दिवशी पुण्यकर्म करावे. यंदा अक्षय्य तृतीया मंगळवार 3 मे दिवशी आहे. अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक असल्याने या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. तसंच कोणतंही शुभकार्य करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. यंदाच्या वर्षी मागील 2 वर्षांपासून असलेलं कोरोनाचं सावट थोडं कमी झाल्याने सण मोठ्या दणक्यात साजरा केला जात आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीया देखील यंदा मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल.

अक्षय्य तृतीये दिवशी लहान मोठी का होईना पण एखादी गोष्ट दान करण्याची प्रथा आहे. समाजातील गरजू गरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हा या मागील उद्देश आहे. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जलदान, ज्ञानदान, पुस्तकदान, श्रमदान, रक्तदान, अर्थदान, वस्त्रदान केले जाते.

अक्षय्य तृतीयेमागची कथा अशी आहे की, शाकल नावाच्या नगरात धर्म नावाचा एक व्यापारी राहत होता. तो रोज देवाची पूजा करीत असे आणि नेहमी सत्य बोलत असे. एके दिवशी एका विद्वानाने त्याला अक्षय्य तृतीयेचे महत्त्व सांगितले. ते ऐकून घेऊन व्यापारी नदीकाठी गेला. तेथे स्नान केले आणि पितरांचे स्मरण केले. त्यानंतर घरी येऊन त्याने पाण्याने भरलेल्या मातीच्या भांड्याचे दान केले. अशा रितीने जलदानाचा उपक्रम त्याने चालूच ठेवला. वृद्धापकाळी भगवंताचे नामस्मरण करीत असतानाच त्याला मृत्यू आला. पुढच्या जन्मी त्याला राजपद मिळाले तरी त्याने दानधर्म चालूच ठेवला. त्यामुळे त्याला बरीच संपत्ती प्राप्त झाली. त्याचा खजिना कधीही रिकामा झाला नाही. म्हणून या दिवशी दानाचे महत्त्व सांगितले आहे.

टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे यामधील  कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.