Easter 2019: जाणून घ्या का साजरा केला जातो ईस्टर, यादिवशी अंड्याचे काय आहे महत्व
ईस्टरच्या दिवशी अंड्यांचे महत्व (Photo Credit-Instagram)

गुरुवारी रात्री येशूने आपल्या अनुयायांसोबत शेवटचे भोजन (Last Supper) घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी प्रभू येशू यांना अनेक प्रकारच्या यातना देऊन सुळावर चढविण्यात आले. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अत्यंत कष्‍ट सहन करून आनंदाने बलिदान दिले. मात्र तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी येशू जिवंत झाले. येशूचा प्रकटण्याचा आणि स्वर्गात आपल्या पित्याकडे जाण्याचा दिवस ईस्टर संडे (Easter) म्हणून साजरा केला जातो. ईस्टर दरवर्षी निश्चित तारखेला ने येता एकवीस मार्च नंतर पहिल्यांदा पूर्ण चंद्र दिसल्या नंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टर येतो.

ख्रिस्ती बांधवांसाठी ईस्टर हा सण ख्रिसमस इतकाच महत्वाचा आहे. खिश्चन बांधवांच्या श्रद्धेनुसार महाप्रभु येशु जीवंत असून महाशक्तिशाली आहे, येशु त्यांचे मन आनंदीत करून त्यांच्यात उमेद व साहस जागवतो. यामुळेच त्यांना दुख: सहन करण्याची शक्ती प्राप्त होते. ईस्टरच्या आदल्या रात्री चर्चमध्ये प्रार्थनेचे (मास)चे आयोजन केले जाते. यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रभू येशूने केलेल्या बलिदानाची आठवण ठेऊन, त्याने आपल्यासाठी पुन्हा जन्म घेतला याबाबत आभार व्यक्त करतात.

ईस्टरच्या सणात अंड्यालाही खूप महत्त्व आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे, आणि प्रभू मृतातून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. अंडे म्हणजे नवीन आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक समजतात. ईस्टर एग्ज म्हणूनही ती ओळखली जातात. या दिवशी अंड्याचे बाह्य आवरण विविध रंगानी आणि सजावटीचे साहित्य वापरून सजवले जातात. लेंटचा उपवासात मांसाहार आणि अंडी खाणे देखील वर्ज असे, तेव्हा खूप अंडी जमा झालेली असत. उपवासानंतर शेतकरी त्यांना उकडवून ठेवत आणि त्याने आपली देणी (थकबाकी) भागवत.

निरनिराळ्या प्रांतानुसार ईस्टर साजरा करण्याची पद्धत बदलते. जर्मनीत काही ठिकाणी उंचावरून अंडे खाली ढकलत न्यायचे.. जो कोणी अंडे न फोडता खाली आणेल तो विजेता. काही ठिकाणी ईस्टर बनीला लहान मुले आपल्या इच्छा सांगणारे पत्र लिहितात आणि त्यांच्या पत्राला पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी ईस्टर बनी बनून उत्तर पाठवतात. अनेक बागांमध्ये लपवलेली अंडी मुलांनी शोधायची स्पर्धा असते.

ईस्टर संडेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी ईस्टर बनी लहान मुलांसाठी रंगीबेरंगी ईस्टरची अंडी घराच्या कानाकोप-यात तसेच झाडाझुडूपांखाली लपवून जातो असे मानतात. अशाप्रकारे चाळीस दिवसांच्या उपवासानंतर, गुड फ्रायडेचे दुःखाच्या दिवसानंतर, ईस्टरच्या निमित्ताने वसंतात होणारा निसर्गाचा पुनर्जन्म, येशूचे पुनरुत्थान आणि मुलांचा आनंद एकत्रितपणे साजरा करायची संधी मिळते.