Diwali 2018 : भारताव्यतिरिक्त या देशांतही धुमधडाक्यात साजरी केली जाते दिवाळी
सिंगापूरमधील दिवाळी (Photo credit : Festivals of India)

हिंदूंच्या मुख्य सणांमध्ये दिवाळीचे अतिशय मानाचे स्थान आहे. किमान तीन हजार वर्षे जुना असलेला हा सण भारतात सर्वत्र मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळीच्या या पाच दिवसांत अंधारावर प्रकाशाचा विजय, दुःखावर आनंदाचा विजय, असुरांवर देवांचा विजय साजरा केला जातो. दारात तेवणाऱ्या पणत्या, आकाशात झुलणारा आकाशकंदील, गोडाधोडाचा फराळ, आतिषबाजी, मिठाई, प्रत्येक दिवशी घरात विविध पूजा साधारण याप्रकारे भारतातल्या प्रत्येक घरात दिवाळी साजरी केली जाते. रावणाचा वध केल्यानंतर याच दिवशी सीतामाईला घेऊन रामचंद्र आयोध्येत परत आले होते. अशाप्रकारे या सणाशी भारतीय संस्कृती जोडली गेली आहे, मात्र आजकाल या सणाला जागतिक स्वरूप येत चालले आहे. हा सण केवळ आपल्याच देशात आनंदाचा प्रकाश पसरवतो असे नाही, तर तो भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांत साजरा केला जातो, आणि नुसताच साजरा केला जात नाही तर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. चला पाहूया असे कोणते देश आहेत, जे अगदी भारतीयांप्रमाणे त्यांच्याही देशात साजरी करतात दिवाळी.

> इंडोनेशिया - 

भलेही इंडोनेशियामध्ये भारतीयांची संख्या कमी आहे, मात्र इथे साजऱ्या होणाऱ्या दिवाळीला तोड नाही. इंडोनेशियाचा प्रसिध्द बाली बीच हा दिवाळी साजरी करण्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. इथेही लोक फराळ बनवतात, फटके फोडतात, मिठाई वाटतात, काही ठिकाणी तर धार्मिक कृत्ये करून दिवाळी साजरी केली जाते.

> मलेशिया –

मलेशियामध्ये 'हरि दिवाळी' या नावाने दिवाळी साजरी होते. मलेशियामध्येही अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. त्यानंतर इथले लोक विविध मंदिरांना भेटी देतात. मलेशियात फटक्यांवर निर्बंध आहेत, मात्र फटक्यांऐवजी इथले लोक मोठ्या प्रमाणावर पणत्या आणि दिवे लावून हा सण साजरा करतात.

> नेपाळ –

नेपाळमध्येही अगदी भारतासारखी 5 दिवसांची दिवाळी साजरी केली जाते. इथेही लक्ष्मीपूजा आणि गणपती पूजेला विशेष महत्व आहे. जगातील एकमेव हिंदू साम्राज्य असलेल्या नेपाळ या देशात दिवाळी ’तिहाड’ म्हणून साजरी केली जाते.

> गुयाना -

दक्षिण अमेरिकेच्या पूर्वोत्तर तटावर स्थित असलेल्या गुयाना या देशात 1980 सालापासून दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. या देशात दिवाळी भारतीय कॅलेंडरनुसार साजरी करतात. सगळ्यात विशेष म्हणजे या देशात दिवाळीला सार्वजनिक सुट्टीदेखील दिली जाते.

> श्रीलंका –

श्रीलंकेतही दीपावली या नावाने दिवाळी हा सण संपूर्ण पाच दिवस साजरा केला जातो. रामायणाचा संबंध श्रीलंकेशी असल्याने इथे या सणाला विशेष महत्व आहे. तसेच या देशांत बरेच भारतीय तमिळ राहत असल्यानेही दिवाळी साजरी करण्याची परंपरा या देशाला आहे.

> मॉरीशस

63 टक्के भारतीय आणि 80 टक्के हिंदू असलेल्या या देशात साहजिकच दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला होता, ही आख्यायिका इथे जास्त प्रचलित आहे, दिवाळीच्या दिवशी इथेही सार्वजनिक सुट्टी दिली जाते.

> सिंगापूर –

सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंची संख्या आहे. या देशात 18 हिंदू मंदिरे आहेत. येथे सेरंगू नावाचा रस्ता हा दिवाळीसाठी खूप प्रसिद्ध आहे. या भागाला लिटील इंडिया म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी सर्व भारतीय मिळून दिवाळी साजरी करतात.

परदेशात राहत असलेल्या भारतीयाला प्रत्येकवर्षी दिवाळीच्या वेळी भारतात येणे शक्य नसल्याने, जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो.