Rape: पतीसमोरच पत्नीवर बलात्कार, धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Representational Image (Photo Credits: ANI)

महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असताना बिहार येथून सर्वांना हादरून टाकणारी एक माहिती समोर आली आहे. बिहारच्या (Bihar) सारन (Saran) जिल्ह्यात एका महिलेवर तिच्या पतीसमोर बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सारण जिल्ह्याचे एसपी संतोष कुमार (SP Santosh Kumar) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. "या व्हिडिओच्या आधारे काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांची कसून चौकशी केली जात असून लवकरच याप्रकरणातील आरोपींना तरूंगात डांबले जाईल", असा विश्वास कुमार यांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती घोसी-परशुरामपूर रोड येथून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. त्यानंतर पीडिताच्या पतीला मारहाण करत तिला जवळच्या झुडुपात खेचून नेले. त्यानंतर तिच्या पतीसमोरच तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हेतर, आरोपींनी निर्घृण कृत्याचा व्हिडिओ बनवून याबाबत पोलिसांना कळविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशीही धमकी पीडित आणि तिच्या पतीला दिली. परंतु, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- Odisha: धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण; मूत्र पिण्यास व विष्ठा खाण्यास भाग पाडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिच्या पतीने अजूनही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. आम्ही व्हायरल व्हिडिओच्या आधारे दखल घेतली आहे. तसेच पीडितावर किती जणांनी अत्याचार केले आहेत, याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासणीनुसार, आतापर्यंत एका आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याचे दिसत आहे, असेही कुमार यांनी म्हटले आहे.