Odisha: धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण; मूत्र पिण्यास व विष्ठा खाण्यास भाग पाडले
मारहाण । प्रतिकात्मक फोटो । (Photo Credits: IANS)

ओडिशामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून एका व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. असाही आरोप केला जात आहे की, या  व्यक्तीला केवळ मारहाणच केली गेली नाही तर, काही महाभागांनी त्याला मूत्र पिण्यास आणि विष्ठा खाण्यास भाग पाडले. ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हरिबंधु बगरती असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्राणघातक हल्ला झाल्यानंतर तो घाबरला आहे, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 3 जुलै रोजी घडली. परंतु याचा व्हिडिओ आता  व्हायरल झाल्यानंतर लोकांना त्याबद्दल माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, बलांगीर जिल्ह्यात काही लोक आजारी पडू लागले होते. मात्र या आजाराचे कारण समजू शकले नाही. हा आजार हरिबंधूच्या काळ्या जादूमुळे झाला असा गावकऱ्यांच्या समज होता. यानंतर ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि हरिबंधूला 'धडा' शिकविण्याचा कट रचला.

3 जुलै रोजी लाठी-काठी घेऊन गावकरी बगरतीच्या घरी पोहोचले आणि त्याला घराबाहेर काढून मारहाण करण्यास सुरवात केली. पोलिसांना याची माहिती 3 जुलै रोजीच मिळाली होती. काही स्थानिकांनी पोलिसांना बोलावले होते. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या काही लोकांना ताब्यात घेतले आणि बगरती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा: धक्कादायक! छत्तीसगड येथे वीज कोसळल्याने 4 मुलांचा दुर्देवी मृत्यू)

इंडिया टुडेशी बोलताना पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी एकूण तीन जणांना अटक केली आहे. दुसरीकडे, पोलिस मुद्दाम उशिरा आल्याचा आरोप बगरतीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी असाही आरोप केला आहे की, हल्लेखोरांनी हरिबंधु यांना मूत्र पिण्यास आणि विष्ठा खाण्यास भाग पाडले गेले.