Ola and Uber: कॅब अॅग्रीगेटर्स ओला (Ola) आणि उबर (Uber) यांच्यावर अँड्रॉइड डिव्हाइस आणि आयफोन डिव्हाइस ग्राहकांकडून वेगवेगळे भाडे आकरले जात आसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर कंपनीने हा आरोप फेटाळून लावला आहे. 'आम्ही भेदभाव करत नाही', असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीने पुढे म्हटले की, ते वापरकर्त्याच्या फोन मॉडेलवर आधारित भाडे निश्चित करत नाहीत. ग्राहक आयफोन वापरत आहे की अँड्रॉइड डिव्हाइस वापरत आहे यावर अवलंबून ओला आणि उबर एकाच सेवेसाठी वेगवेगळे भाडे आकारतात, अशा वृत्तानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) उत्तर मागवले होते.
ओला कंझ्युमर प्रवक्त्याचे विधान
एका निवेदनात, ओला कंझ्युमरच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आमच्या सर्व ग्राहकांसाठी आमच्याकडे एकसमान किंमत रचना आहे. आम्ही वापरकर्त्याच्या सेलफोनच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारावर समान प्रवासासाठी भेदभाव करत नाही. आम्ही सीसीपीएला हे स्पष्ट केले आहे आणि या संदर्भात कोणतेही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करू," असे प्रवक्त्याने सांगितले. आम्ही रायडरच्या फोनच्या आधारे किंमती निश्चित करत नाही.”
राईड बुकिंगवर जास्त शुल्क आकारल्याची तक्रार
ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वेगवेगळ्या मोबाईल मॉडेल्ससाठी वेगवेगळी किंमत आढळल्याने ग्राहक व्यवहार विभागाने CCPA मार्फत ओला आणि उबर यांना नोटीस पाठवली आहे आणि त्यांचा प्रतिसाद मागितला होता. अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या वेगवेगळ्या मोबाईल फोनवरून एकाच अंतराच्या राईड बुक करण्यासाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. आयफोन वापरून राईड्स बुक करण्यासाठी जास्त पैसे आकारले जात असल्याची तक्रार लोकांनी केली होती. जोशी यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की अशा कृती प्रथमदर्शनी ग्राहकांच्या अधिकारांचे उल्लंघन आहेत. त्यांनी सीसीपीएला आरोपांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.